१४ टक्क्यांची सेवा कर आकारणी बेकायदा!
By admin | Published: April 3, 2015 02:35 AM2015-04-03T02:35:19+5:302015-04-03T02:35:19+5:30
केंद्रीय अर्थसंकल्पात सेवा कराचे प्रमाण १२.३६ टक्क्यांवरून (सर्व अधिभारांसह) १४ टक्के इतके करण्यात आले असले तरी अद्यापही त्याची अधिसूचना
मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पात सेवा कराचे प्रमाण १२.३६ टक्क्यांवरून (सर्व अधिभारांसह) १४ टक्के इतके करण्यात आले असले तरी अद्यापही त्याची अधिसूचना निघालेली नाही. मात्र अनेक व्यापाऱ्यांनी १४ टक्के दराने सेवा कराची आकारणी सुरू केली असून, जोपर्यंत अधिसूचना निघत नाही तोपर्यंत अशी १४ टक्क्यांची आकारणी बेकायदा असल्याचे केंद्रीय सेवा कर विभागाने स्पष्ट केले आहे.
अर्थसंकल्पात स्वस्त व महाग होणाऱ्या गोष्टींसोबतच करातील बदलांची जी घोषणा होते. त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून अर्थात नव्या आर्थिक वर्षापासून होते. पण कर रचनेसंदर्भात सरकारतर्फे अधिसूचना प्रसिद्ध होते आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी होते. साधारणपणे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ही अधिसूचना प्रसिद्ध होते. परंतु, यंदा सेवा करात १२.३६ टक्क्यांवरून १४ टक्के इतकी वाढ करतानाच त्यात स्वच्छ भारत अभियानासाठीचा अधिभारही समाविष्ट करण्याचा सरकारचा विचार आहे. परंतु, सध्याच्या कर रचनेत शैक्षणिक व उच्चशिक्षणाचा अधिभार लागू असून, त्यात हा नवा अधिभार लागू करून त्यानुसार कराचे गणित जमवावे लागणार आहे. यामुळेच अधिसूचनेला विलंब झाल्याचे समजते. अधिसूचना जरी निघालेली नसली तरी आता १ एप्रिलपासून व्यापाऱ्यांनी १४ टक्के दराने सेवाकराची आकारणी सुरू केली आहे. पण, अद्यापही वाढीव सेवाकराची अधिसूचनाच निघालेली नसल्याने गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली १४ टक्क्यांची आकारणी ही बेकायदा आहे. जोपर्यंत वाढीव कराची अधिसूचना प्रसिद्ध होत नाही तोवर लोकांनी तो भरू नये, तसेच जर कुणी हा भरण्याची सक्ती केलीच तर त्यासंदर्भात थेट सेवा कराच्या विभागीय कार्यालयात तक्रार करावी, असे आवाहन विभागाने केले आहे.