म्हाडा बांधणार १४ हजार घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2017 04:36 AM2017-03-30T04:36:31+5:302017-03-30T04:36:31+5:30

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा २०१७-१८चा ६ हजार ८९१.४५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी

14 thousand houses to be built in MHADA | म्हाडा बांधणार १४ हजार घरे

म्हाडा बांधणार १४ हजार घरे

Next

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा २०१७-१८चा ६ हजार ८९१.४५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी प्राधिकरणाच्या विशेष बैठकीत मंजूर करण्यात आला. २०१७-१८ साली गृहनिर्माण कार्यक्रमांतर्गत व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदनिकांचे काम राज्यात होणार असून, सुमारे १४ हजार ४४० घरे बांधण्यात येणार आहेत. तर मुंबईतील ६७९ इमारतींची दुरुस्ती करण्याचे प्रस्तावित आहे.
लॉटरी झालेल्या इमारतीच्या वितरणापोटी चालू वर्षी ६५५ कोटींपर्यंतची रक्कम घरांच्या विक्रीतून वसूल झाली आहे. पुणे, कोकण मंडळाकडे निर्माण झालेल्या घरांच्या विक्रीसह संपूर्ण राज्यातून ४ हजार २६६ कोटी मिळणार आहेत. म्हाडाच्या उपलब्ध जमिनीवरील कार्यक्रमांबरोबरच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरबांधणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, यासाठी सुमारे १ हजार ५९६.९७ कोटी खर्च अपेक्षित आहे. २०१७-१८ साली गृहनिर्माण कार्यक्रमांतर्गत व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदनिकांचे काम राज्यात होणार आहे. (प्रतिनिधी)

६७९ इमारतींची दुरुस्ती
मुंबई इमारत आणि पुनर्रचना मंडळाच्या माध्यमातून २०१६-१७मध्ये अंदाजित ७५७ मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती करण्यात आली असून, पुढील वर्षी ६७९ इमारतींची दुरुस्ती करण्याचे अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले आहे.

अनुदानासाठी २० कोटी
राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना कर्जावरील व्याजाच्या अनुदानासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

दुरुस्तीसाठी २५ कोटी
पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

झोपडपट्ट्यांचे जीवनमान सुखकर
मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या माध्यमातून नागरी दलित वस्ती सुधार योजना, सौंदर्यीकरण, शासकीय जमिनीवर अतिक्रमण रोखण्यासाठी संरक्षण भिंती बांधणे इत्यादी कार्यक्रमांच्या माध्यमातून मुंबईतील झोपडपट्ट्यांचे जीवनमान सुखकर करणे अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे.

Web Title: 14 thousand houses to be built in MHADA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.