सोसायटीच्या छतावर रोज १४ युनिट वीजनिर्मिती
By admin | Published: March 9, 2016 04:22 AM2016-03-09T04:22:06+5:302016-03-09T04:22:06+5:30
महावितरणच्या वाशी परिमंडळ क्षेत्रामध्ये छतावर वीजनिर्मितीचा पहिला प्रकल्प पनवेलमध्ये डॉ. प्रशांत गायकवाड यांच्या घरावर सुरू करण्यात आला आहे. ३.५ किलोवॅट क्षमतेची यंत्रणा बसविण्यात आली
नवी मुंबई : महावितरणच्या वाशी परिमंडळ क्षेत्रामध्ये छतावर वीजनिर्मितीचा पहिला प्रकल्प पनवेलमध्ये डॉ. प्रशांत गायकवाड यांच्या घरावर सुरू करण्यात आला आहे. ३.५ किलोवॅट क्षमतेची यंत्रणा बसविण्यात आली असून, त्यापासून रोज १४ युनीट वीजनिर्मिती होणार आहे.
केंद्र व राज्य शासनाने अपारंपरिक ऊर्जानिर्मितीकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. अपारंपरिक ऊर्जानिर्मितीला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून छतावर सौरऊर्जानिर्मिती यंत्रणा उभारणाऱ्या नागरिकांचा सन्मान करण्याच्या सूचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत. यापूर्वी मुंबईतील भाजपा खासदार किरीट सोमय्या व ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर येथील कार्यालयाच्या छतावर अशाप्रकारची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामध्ये अद्याप अशाप्रकारचा एकही प्रकल्प सुरू झाला नव्हता. पनवेलमधील डॉ. प्रशांत गायकवाड यांनी त्यांच्या घराच्या छतावर ३.५ किलोवॅट क्षमतेची यंत्रणा बसविलेली आहे. या माध्यमातून रोज १४ युनिट वीजनिर्मिती होणार आहे. हा पहिलाच प्रयोग असल्यामुळे भांडुप नागरी परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी गायकवाड यांच्या घरी जाऊन त्यांचा विशेष सत्कार केला.
भावी पिढीच्या आरोग्यदायी जीवनाच्या अनुषंगाने पर्यावरणाची जपणूक करणाऱ्या सौरऊर्जानिर्मितीस वाव मिळावा, यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विनियमन २०१५ प्रमाणे वैयक्तिक नागरिक व संस्था त्यांच्या छतावर अशाप्रकारची यंत्रणा बसवू शकतात, असे मुख्य अभियंता अभियंता सतीश करपे यांनी सांगितले. गायकवाड यांनी उभारलेली सोलर नेट मीटरिंग यंत्रणा हा या परिसरातील पहिलाच प्रयोग असल्याने शहरामध्येही या प्रकल्पाचे कौतुक होत आहे.
महावितरण अधिकाऱ्यांनी गायकवाड यांच्या पनवेल सेक्टर २ मधील घरी जाऊन सत्कार केला तेव्हा वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर मानकर, कार्यकारी अभियंता जफर खान, डी. व्ही. गोसावी, पी. एन. वडनेरे व इतर अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
> एक महिन्यात
१० प्रकल्प
सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. महावितरणच्या भांडुप परिमंडळामध्ये मार्चअखेरपर्यंत १० सौरऊर्जानिर्मिती यंत्रणा कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापुढे नियमितपणे नागरिकांना यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असून, अशाप्रकारचा प्रकल्प राबविणाऱ्यांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला जाणार असल्याचेही सतीश करपे यांनी सांगितले.