#KamalaMillsFire: निष्काळजीपणाचे 14 बळी, पबमालकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 06:26 AM2017-12-30T06:26:18+5:302017-12-30T06:27:53+5:30
मुंबई : लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमधील ट्रेड हाउस या इमारतीत लागलेल्या भीषण आगीत ११ तरुणींसह १४ जणांचा गुदमरून मृत्यू झाला.
मुंबई : लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमधील ट्रेड हाउस या इमारतीत लागलेल्या भीषण आगीत ११ तरुणींसह १४ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली. इमारतीतील मोजोस ब्रिस्ट्रो आणि वन-अबव्ह या पब, रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या अग्नितांडवामध्ये २४ महिलांसह ५४ जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर पबमालक अभिजित मानकर, रितेश संघवी, जिगर संघवी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींना ताब्यात घेतले आहे. तर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत महापालिकेच्या पाच अधिका-यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. या आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून पबमध्ये असलेल्या हुक्का पार्लरमुळे की, शॉर्ट सर्किटमुळे आग भडकली, याबाबत तपास सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशीचे आदेश दिले. तर विरोधी पक्षांनी या प्रकरणी राज्य सरकार व महापालिकेला जबाबदार धरत या घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.
कमला मिलमधील मोजोस ब्रिस्ट्रो आणि वन-अबव्ह या पब-रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास आग लागली. त्या वेळी सुमारे ५५ ते ६० ग्राहक उपस्थित होते. काही जण पार्टीसाठी तर काही जण जेवायला आले होते. आगीच्या ज्वाळा दिसताच त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र बाहेर जाण्यासाठी एकच चिंचोळा मार्ग होता. त्यामुळे त्यांच्यात घबराट उडाली. बाहेर पडता येत नसल्याने काही जण प्रसाधनगृहात गेले. मात्र आगीच्या धुरामुळे गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाने सुमारे ५ तासांनंतर आग आटोक्यात आणली. दुर्घटनेतील सर्व मृत्यू हे नाका-तोंडात धूर गेल्याने गुदमरून झाल्याची माहिती केईएमचे फॉरेन्सिक मेडिकलचे प्रा. राजेश डेरे यांनी दिली.
या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. दुर्घटनेचे तीव्र पडसाद महापालिकेपासून संसदेमध्येही उमटले. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी लोकसभेत केली. तर भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी कमला मिल कम्पाउंड आणि फिनिक्स मिलमधील सर्व रेस्टॉरंट, पब आणि बारचे फायर आॅडिट करण्याची मागणी केली आहे. भाजपाच्या खासदार हेमामालिनी यांनी मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येवर ठपका ठेवत मुंबईत येणारे लोंढे रोखण्याची मागणी केली.
>मृतांची नावे :
प्रीती राजानी, तेजल गांधी, कविता धोरानी, किंजल शहा, प्रमिला केनिया, शेफाली दोषी, पारुल, खुशबू मेहता-बन्सल, मनीषा शहा, प्राची खेतान, यशा ठक्कर, सरबजीत परीदा, धैर्य ललानी, विश्व ललानी
>पाच निलंबित
महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील इमारत व कारखाने खात्याचे पदनिर्देशित अधिकारी मधुकर शेलार, दुय्यम अभियंता दिनेश महाले, कनिष्ठ अभियंता धनराज शिंदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बडगिरे आणि साहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी एस.एस. शिंदे या पाच अधिकाºयांचे निलंबन करण्यात आले आहे. तर विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची उचलबांगडी करण्यात आल्याचे पालिका आयुक्त अजय मेहता यांनी सांगितले.
>बांधकामांचे होणार आॅडिट : मुख्यमंत्री
कमला मिल कम्पाउंडमधील बांधकामांचे युद्धपातळीवर आॅडिट करण्यात येणार असून या पाहणीत जर अनधिकृत बांधकामे आढळली तर ती तत्काळ पाडली जातील. तसेच बांधकामे आणि पब्सना परवानग्या देण्याबाबत महापालिका अधिकाºयांनी निष्काळजीपणा दाखवला असेल, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
>हुक्का पार्लरमुळे आग ?
कमला मिल कम्पाउंडमधील ही आग शॉर्ट सर्किटमुळे नव्हेतर, पबवर असलेल्या अनधिकृत हुक्का पार्लरमुळे लागल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रत्यक्षदर्शींनीच त्याबाबतची माहिती दिली आहे.