मुंबईत 'ब्लू व्हेल' गेमच्या नादात 14 वर्षीय मुलाची आत्महत्या ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 07:24 PM2017-07-31T19:24:28+5:302017-07-31T19:32:43+5:30
उपनगरात अंधेरी इथे रहाणा-या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने शनिवारी इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली.
मुंबई, दि. 31 - उपनगरात अंधेरी इथे रहाणा-या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने शनिवारी इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. 'ब्लू व्हेल' या ऑनलाइन गेमच्या नादात मुलाने आत्महत्या केल्याची माहिती इंडिया टुडेने मुंबई पोलीस दलातील सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. सदर मुलाला ब्लू व्हेल या ऑनलाइन गेमचे व्यसन जडले होते. रशिया आणि अन्य देशांमध्येही काही जणांना या गेमच्या नादात आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.
अंधेरी पोलीस या मुलाच्या आत्महत्येमागच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत. 9 व्या इयत्तेत शिकणारा हा मुलगा अंधेरीतील एका आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये शिकत होता. त्याला आई-वडिल आणि दोन बहिणी असा परिवार आहे. आत्महत्या करणा-या मुलाला पायलट बनण्याची इच्छा होती. प्रशिक्षणासाठी रशियाला जाण्याचीही इच्छा त्याने व्यक्त केली होती. महत्वाचे म्हणजे ब्लू व्हेल या खेळाची सुरुवात रशियामधूनच झाली आहे.
शेजारच्या इमारतीत रहाणा-या लोकांनी शनिवारी या मुलाला इमारतीच्या गच्चीवर पाहिले होते. त्यावेळी तो स्वत:चा सेल्फी व्हिडीओ काढताना दिसत होता. अंधेरी पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यू अशी नोंद केली आहे. ही आत्महत्या ब्लू व्हेल या खेळामुळे झाली कि, अन्य कारणामुळे ते पोलिसांनी अजून स्पष्ट केलेले नाही. पालक अजूनही या आत्महत्येबद्दल बोलायला तयार नाहीत. त्यांना धक्का बसला आहे. आम्ही सर्व अंगांनी तपास करत आहोत असे या प्रकरणाचा तपास करणा-या अधिका-याने सांगितले.
काय आहे ब्लू व्हेल
ब्लू व्हेल हा एक व्हिडीओ गेम असून, रशियामधून या खेळाची सुरुवात झाली. हा खेळ बनवणा-या रशियन पोलिसांनी वर्षाच्या सुरुवातीला अटक केली होती.
हा गेम खेळणा-याला 50 चॅलेंजेस मिळतात. अंतिम टप्प्यात आत्महत्या करायला सांगितली जाते. प्रत्येक टप्पा पार केल्यानंतर फोटोंच्या रुपात स्टोर करायचा असतो.
एक टप्पा पार केल्यानंतर पुरावा द्यावा लागतो नंतर तुम्ही पुढच्या टप्प्यासाठी पात्र ठरता.