‘युतीमधील एकोप्याअभावी १४ वर्षांचा वनवास’
By admin | Published: January 21, 2017 04:35 AM2017-01-21T04:35:46+5:302017-01-21T04:35:46+5:30
भाजपा व शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. अनेक निवडणुकांमध्ये आमची युती राहिली
जळगाव : भाजपा व शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. अनेक निवडणुकांमध्ये आमची युती राहिली. परंतु एकोप्याने निवडणुकीला सामोरे न गेल्याने २००० ते २०१४ अशी १४ वर्षे आम्ही सत्तेपासून दूर राहिलो, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. पाटील यांनी शुक्रवारी ‘लोकमत’च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
भाजपाचे सेनेशी काही मुद्द्यांवर मतभेद आहेत. मात्र राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांसारखे आमच्यात मनभेद नाही, त्यामुळे त्याचा विकास कामांवर फार काही परिणाम होत नाही, असे ते म्हणाले. युती करायची आणि एखादी जागा जास्त आली म्हणून वर्चस्वासाठी लढायचे यामुळे सत्ता दूर राहिली. मात्र आता बदलले पाहिजे. सेना व भाजपाच्या उद्दिष्टासाठी सत्ता आली पाहिजे नंतर ‘वितरणा’साठी भांडणे करू, असे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुरघोड्या थांबणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
भाजपाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्व तयारी केली आहे. आम्हाला ११४ जागा कोणत्या हव्या आहेत. त्याची यादी आम्ही शिवसेनेला दिली आहे. भाजपाचे १६ आमदार आहेत. सहाजिक आपल्या मतदार संघातील, वॉर्डात कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी त्यांची इच्छा असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
भाजपा व शिवसेना युतीबाबत मी व्यवहार व तत्त्वज्ञान या दोन गोष्टी मानतो. व्यवहार म्हटला तर २०१३ मध्ये शिवसेनेकडे जास्त जागा होत्या. २०१४ मध्ये स्थिती बदलली आणि भाजपा मोठा पक्ष झाला. त्यावेळी व्यवहार म्हणून दोघांना एकत्र यावे लागले. पण तत्त्वज्ञान म्हणून, भाजपा व शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. दोघांचा राजकीय अजेंडा एक नसला तरी उद्दिष्ट मात्र एक आहे. कुठे जायचे, काय साधायचे हे आमचे समान तत्त्व आहे, असा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)
>युती म्हणून आम्ही जे मानतो ते शिवसेनेने मानले पाहिजे. एका कुटुंबात एका भावाचे खूप चालते. काळाच्या ओघात दुसरा भाऊ मेहनतीने मोठा झाल्यास आई-वडील त्याचे ऐकतात. त्यामुळे आधी ज्याचे घरात चालायचे तो घर सोडून जात नाही. या साऱ्यात त्या मुलाच्या मनात दु:ख, असूया राहते. शिवसेना व भाजपा युतीचेदेखील तसेच आहे. - चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री