अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी न्यायालयात १४०० पानी आरोपपत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 01:29 IST2020-12-18T01:28:46+5:302020-12-18T01:29:16+5:30
अर्णब गोस्वामी, नितेश सरडा, फिरोज शेख यांना समन्स

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी न्यायालयात १४०० पानी आरोपपत्र
रायगड : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी सुमारे १४०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. याबाबत बुधवारी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. आरोपींविरोधात दाखल केलेल्या दोषारोपपत्राची दखल न्यायालयाने घेत अर्णब गोस्वामी, नितेश सरडा आणि फिरोज शेख या तिघांना न्यायालयाने समन्स जारी केले आहेत. त्यामुळे ७ जानेवारीला तीनही आरोपींना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी, नितेश सरडा आणि फिरोज शेख यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रायगड पोलिसांनी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. आता ७ जानेवारीपासून सुनावणी सुरू होणार आहे. दोषारोपपत्राबाबत आरोपी पक्ष उच्च न्यायालयात गेले आहेत. याबाबत न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्राची दखल घेऊ नये, असा युक्तिवाद केला. तर उच्च न्यायालयाने वा सर्वोच्च न्यायालयाने याबाबत कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे हा खटला सुरू राहावा, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला. न्यायदंडाधिकारी यांनी दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतला.