गणेशोत्सवासाठी १४२ गाड्या

By admin | Published: June 1, 2017 04:00 AM2017-06-01T04:00:25+5:302017-06-01T04:00:25+5:30

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकण मार्गावर तब्बल १४२ विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने

142 trains for Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी १४२ गाड्या

गणेशोत्सवासाठी १४२ गाड्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकण मार्गावर तब्बल १४२ विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/ लोकमान्य टिळक टर्मिनस/ दादर/ पुणे-करमळी/ सावंतवाडी/ रत्नागिरी या स्थानकांदरम्यान या ट्रेन चालवण्यात येतील.
ट्रेन क्रमांक ०१४४५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी (दररोज) १८ आॅगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान एकमार्गी चालवण्यात येणार आहे. मुंबई येथून रात्री ००.३० वाजता निघणार असून, दुपारी १४.३० वाजता करमळी येथे पोहोचणार आहे. ०१४४६ करमळी-पुणे. करमळीहून रोज दुपारी १५.२५ वाजता पुण्याच्या दिशेने सुटणार आहे. ट्रेन क्रमांक ०१४४७ पुणे-सावंतवाडी रोड स्थानकांदरम्यान १९ आॅगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान आणि ०१४४८ सावंतवाडी-मुंबई ही ट्रेन चालवण्यात येणार आहे.
ट्रेन क्रमांक ०१११३/ ०१११४ दादर-सावंतवाडी त्रिसाप्ताहिक विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहे. १८ आॅगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान प्रत्येक रविवार, मंगळवार, शुक्रवारी दादर येथून सावंतवाडीसाठी सुटेल.
श्रावण स्पेशल ट्रेन
श्रावण महिन्यात उत्तर भारतातील तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी रेल्वेच्या आयआरसीटीसीने विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. खास कोकणवासीयांसाठी सावंतवाडी येथून २७ जुलै २०१७ रोजी ‘भारत दर्शन श्रावण स्पेशल टुरिस्ट ट्रेन’ निघणार आहे. उत्तर भारतातील मथुरा, आग्रा, हरिद्वार, हृषिकेश, अमृतसर- सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर आणि वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन ४ आॅगस्ट रोजी ही विषेश रेल्वे सावंतवाडीला परतेल. आठ रात्री आणि नऊ दिवसांच्या या तीर्थयात्रेसाठी एका व्यक्तीसाठी अवघे ८ हजार ८३० इतक्या कमी दर आकारण्यात येणार आहे. संपूर्ण तीर्थयात्रेदरम्यान प्रवास, निवास आणि खाण्यापिण्याची व्यवस्था आयआरसीटीसीकडून करण्यात येणार आहे. या भारत दर्शन पॅकेजची नोंदणी सुरु झाली असून या सुविधेमुळे भाविकांना कमी पैशांत चांगली सोय उपलब्ध झाली आहे.

डबल डेकर धावणार

मध्य रेल्वेच्या ताफ्यात तेजस एक्स्प्रेसच्या समावेशाने ‘डबलडेकर’ ट्रेन बंद करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र मध्य रेल्वेने याला पूर्णविराम दिला आहे. २२ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर यादरम्यान दर मंगळवारी ०११८७ / ०११८८ लोकमान्य टिळक टर्मिनस-रत्नागिरी-लोकमान्य टिळक टर्मिनस (डबल डेकर) चालविण्यात येणार आहे.




कोकण मार्गावर वातानुकूलित एसटी
महेश चेमटे/लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असून, कोकणातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) गणेशोत्सवात कोकण मार्गावर वातानुकूलित एसटी चालवण्याचे ठरवले आहे.
एसटी प्रशासनाची आर्थिक परिस्थिती बिकट असून, प्रशासन आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी विविध प्रयोग राबवत आहे. कोकणात गणेशोत्सव आणि होळी हे सण मोठ्या प्रमाणात साजरे होतात. त्यामुळे गणेशोत्सव काळात वातानुकूलित एसटी चालवण्याचे एसटी प्रशासनाने ठरवले आहे. वातानुकूलित एसटीसाठी निविदा मंजूर झाल्या असून, लवकरच एसी बस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. एसटीची ‘विश्वासार्हता’ आणि ‘सुखरूप प्रवासाची हमी’ लक्षात घेता वातानुकूलित सेवेला चांगला प्रतिसाद मिळे
ल, असा विश्वास एसटी प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

 एसटी महामंडळाने आरक्षित तिकीट रद्द करण्याबाबतच्या शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २४ तासांआधी आरक्षित तिकीट रद्द केल्यास १० टक्के प्रवास भाडे शुल्क कापून उर्वरित रक्कम प्रवाशांना परत देण्यात येईल. तर, ४ तासांपर्यंत तिकीट रद्द केल्यास ५० टक्के रक्कम कापून घेण्यात येईल.
२एसटीच्या जुन्या नियमांप्रमाणे नियोजित वेळेच्या चार तासआधी तिकीट रद्द केल्यास, अवघे ५ रुपये कपात करून उर्वरित रक्कम प्रवाशांना परत केली जात असे. गर्दीच्या काळात प्रवासी एसटीचे आरक्षण करून ठेवतात. मात्र, ऐन वेळी तिकीट रद्द करून खासगी वाहतूक व्यवस्थेने प्रवास करतात. त्यामुळे एसटी महामंडळाला नुकसान सोसावे लागते.
३परिणामी, आरक्षित तिकीट रद्द करण्याच्या नियमांत बदल करून दंडात्मक रक्कम वाढवण्याचा निर्णय एसटी महामंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. नवीन नियमांप्रमाणे नियोजित वेळेच्या १२ तासांआधी तिकीट रद्द केल्यास, २५ टक्के प्रवासभाडे कापून घेण्यात येईल.
४त्याचबरोबर तिकीट रद्द करताना, कोणत्याही स्वरूपाचे शुल्क न आकारण्याचा निर्णय एसटी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. (या पूर्वी ०.५० पैसे आणि १ रुपया आकार लावण्यात येत असे.) शिवाय पुसट, खराब झालेल्या, फाटलेल्या अथवा जीर्ण झालेल्या आगाऊ आरक्षण तिकिटावर परतावा मिळणार नसल्याचेही एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: 142 trains for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.