अडीचशे फूट उंच टेकडीवर जगविले १४२ वटवृक्ष!
By Admin | Published: November 2, 2016 05:55 PM2016-11-02T17:55:45+5:302016-11-02T17:55:45+5:30
सुमारे अडीचशे फूट उंच ‘ती’ एक टेकडी. पावसाळ्यात आणि हिवाळ्यातील काही काळ प्रसन्न वाटणारी. उन्हाळ्यात ओसाड आणि निरस पडणारी.
>ऑनलाइन लोकमत/अनिल गवई
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 02 - सुमारे अडीचशे फूट उंच ‘ती’ एक टेकडी. पावसाळ्यात आणि हिवाळ्यातील काही काळ प्रसन्न वाटणारी. उन्हाळ्यात ओसाड आणि निरस पडणारी. मात्र, त्याच टेकडीचे एका अवलियाच्या प्रयत्नांनी आता रुपडे पालटले आहे. या अवलियाच्या वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपणाच्या ‘कृती’शील संकल्पाने टेकडीवर १४२ वटवृक्षांसोबतच फुल आणि फळझाडांची हिरवळ पसरली आहे.
नांदुरा तालुक्यातील तरवाडी येथील डोंगराळ भागात सुमारे अडीचशे फूट उंच टेकडीवर हेमाड पंथी महादेवाचे पुरातन मंदिर आहे. टेकडीवर म्हणजेच बरडीवर स्थापित असल्यामुळे येथील महादेवाची बर्डेश्वर अशीच ओळख पंचक्रोशीत आहे. नवसाला पावणारा आणि जागृत देवस्थान म्हणून परिसरात अनेकांना या महादेवाचा प्रत्यय आल्याने, श्रावण महिन्यातील प्रत्येक श्रावण सोमवारी नांदुरा तालुक्यासह, खामगाव, मलकापूर, मोताळा तालुक्यातील आसपासच्या गावातील भाविकांची येथे गर्दी जमते. तथापि, श्रावण महिन्यात हिरवळीमुळे या बर्डेश्वर महादेव मंदिरात अतिशय प्रसन्न वाटते. निसर्ग रम्य परिसर असल्याने, दर्शनासोबतच काही जण पर्यटनाचाही आनंद घेतात. मात्र, टेकडीमुळे झाडं जगत नसल्याने तसेच उन्हामुळे हिवाळ्याच्या शेवटीच हा परिसर ओसाड वाटू लागतो. झाडं झुडपं नसल्याने, महाशिवरात्रीही ओसाडातच साजरी होत होती. ही बाब गेल्या १०-१२ वर्षांपासून या मंदिरात पौराहित्य करणाºया श्री राधेराधे महाराज यांच्या संवेदनशील मनावर खोलवर जखम करून गेली. त्यानंतर त्यांनी या टेकडीवर वृक्षारोपणाचा आणि संगोपणाचा संकल्प सोडला. टेकडीवर पाण्याचा अभाव आणि मुरूम असल्याने झाडे जगत नव्हती. अशाही परिस्थितीत खचून न जाता, त्यांनी आपला संकल्प नांदुरा येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष मोहता यांना सांगितला. सुभाष मोहता यांनी मदतीची तयारी दर्शविल्यानंतर सन २०११ पासून जमिनीपासून अडीचशे फूट उंच अंतरावर असलेल्या टेकडीवर वटवृक्षांच्या लागवडीला सुरूवात करण्यात आली. पहिल्याच टप्प्यात ५१ वृक्ष लावण्यात आली. यातील काही वृक्ष जगली. तीन टप्प्यात १४२ वटवृक्षांची लागवड करण्यात आली. यापैकी काहीतर लवकरच कोमेजली. काही जळाली. तथापि, मुरूम आणि नैसर्गिक आपत्तीमुळे जगू न शकलेल्या वटवृक्षाच्या ठिकाणी पुन्हा-पुन्हा वृक्ष रोपट्यांची लागवड केल्या जाते. त्यामुळे ओसाड टेकडीही हिरवी गार झाली आहे.
ओसाड टेकडीवर फुलली हिरवळ!
वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपणाच्या ध्येयाने प्रेरीत झालेल्या अवलियामुळे ओसाड टेकडीवर आता १४२ वटवृक्षांसोबतच इतर फळ आणि फुलझाडांचीही हिरवळ फुलली आहे. अर्थातच टेकडीवर हिरवळ फुलविण्याचे अग्नीदिव्य कुणाच्याही मदतीशिवाय अशक्य होते. मात्र, ती गरज नांदुरा येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष मोहता यांनी पूर्ण केली. टेकडीवर वृक्ष लावण्यासाठी नर्सरीतील वटवृक्षांच्या रोपांसोबतच व वृक्ष लावण्यासाठी खड्डे खोदण्यासाठी , सपाटीकरणासाठी जेसीबी आणि काळी मातीही पुरविली.
सात फुटांपर्यंत झाली वटवृक्षांची वाढ!
टेकडीवर नर्सरीतील दीड-ते दोन फुट उंचीच्या लावण्यात आलेल्या वटवृक्षांपैकी अनेक वृक्षांची आता तब्बल सात फुटांपर्यंत वाढ झाली आहे. टेकडीवरील काठा-काठाने या वृक्षांची लागवड करण्यात आल्याने, कुंपनाचाही प्रश्न मिटला आहे. वृक्ष वृक्षाला जनावरे खात नाहीत. तसेच या वृक्षाची हानी होत नाही. त्यामुळे लागवडीसाठी प्रामुख्याने वटवृक्षालाच प्राधान्य देण्यात आले. सोबतच वटवृक्षाचे आध्यात्मिक महत्वही या निमित्ताने जोपासण्यात आले.
ओसाड टेकडीला निसर्ग रम्य बनविण्यासाठी टेकडीवर १४२ वटवृक्षांसोबतच इतरही वृक्षांची लागवड करण्यात आली. सामाजिक दायित्वाशिवाय हे काम अपूर्ण होते. २०११ पासून वृक्षारोपण आणि संगोपन केल्या जात आहे.
-श्री राधेराधे महाराज गोसावी
महंत बर्डेश्वर महादेव देवस्थान, तरवाडी