एसटीत १४,२४७ जागा भरणार !
By admin | Published: January 5, 2017 04:16 AM2017-01-05T04:16:50+5:302017-01-05T04:16:50+5:30
एसटी महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने सध्याच्या मनुष्यबळावर कामाचा ताण पडतो. एकंदरीतच एसटीतील रिक्त जागांचा
मुंबई : एसटी महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने सध्याच्या मनुष्यबळावर कामाचा ताण पडतो. एकंदरीतच एसटीतील रिक्त जागांचा आढावा घेतल्यानंतर, १४ हजार २४७ विविध पदे भरण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यामध्ये कोकण विभागासाठी (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर) सर्वाधिक ७ जार ९२३ चालक, तसेच वाहकांची भरती केली जाईल. कोकण विभागात चालक मनुष्यबळाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे आणि तो या भरती प्रक्रियेमुळे सुटू शकतो.
चालक-वाहकांच्या भरतीबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रासाठी २ हजार ५४८ लिपिक, ३ हजार २९३ सहायक व ४८३ पर्यवेक्षकांची भरती करण्यात येईल. भरतीची जाहिरात ७ जानेवारीपासून एसटी महामंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ जानेवारीपासून सुरू होईल, तर अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३ फेब्रुवारीपर्यंत असेल, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली.
अर्जात अनावधानाने राहून गेलेली अथवा चुकीची माहिती बदलण्याचीही मुभा एसटी महामंडळाकडून उमेदवाराला देण्यात आली आहे. त्यासाठी ६ फेब्रुवारी ते १0 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ असेल. २0१४ मध्ये एसटी महामंडळात मोठी भरती झाली होती. त्यानंतर, महामंडळात भरती प्रक्रिया झाली नाही. दोन वर्षांत एकही जागा भरली न गेल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त झाल्या. एसटी महामंडळासाठी वर्ग-१ ते वर्ग-४ साठी १ लाख २0 हजार जागा मंजूर असून, सध्याच्या घडीला १ लाख ५ हजारापर्यंत मनुष्यबळ कार्यरत आहे. त्यामुळे रिक्त जागा बघता, या जागा भरण्याच्या सूचना परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी महामंडळाला केल्या होत्या. त्यानुसार, पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)