शिवसेनेच्या 15 ते 20 आमदारांना हवं भाजपाबरोबर सरकार, उद्धव ठाकरेंकडून मनधरणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 11:55 AM2019-11-25T11:55:55+5:302019-11-25T11:56:50+5:30

अजित पवार हे भाजपाबरोबर गेल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळंच वळण लागलं आहे.

15 to 20 MLAs of Shiv Sena want BJP alliance with Uddhav Thackeray | शिवसेनेच्या 15 ते 20 आमदारांना हवं भाजपाबरोबर सरकार, उद्धव ठाकरेंकडून मनधरणी

शिवसेनेच्या 15 ते 20 आमदारांना हवं भाजपाबरोबर सरकार, उद्धव ठाकरेंकडून मनधरणी

Next

मुंबई- अजित पवार हे भाजपाबरोबर गेल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळंच वळण लागलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या गोटातही खळबळ उडाली. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासाठी आणखी बराच काळ वाट पाहावी लागू शकते, अशीही अटकळ बांधली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या 15 ते 20 आमदारांना भाजपाबरोबर युती हवी आहे. शिवसेनेच्या रविवारी रात्री झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना काही आमदारांनी आपण भाजपाबरोबर जाऊ शकत नाही काय?, असा प्रश्न विचारल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे रात्री उशिरापर्यंत त्या आमदारांची समजूत काढत थांबले होते. तसेच आदित्य ठाकरेही हॉटेल ललितमध्ये असलेल्या आमदारांच्या संपर्कात आहेत.
 
भाजपाबरोबर सरकार बनवण्यात अपयश आल्यानंतर शिवसेनेनं आपल्या आमदारांचा घोडेबाजार होऊ नये, यासाठी त्यांना एका हॉटेलमध्ये सुरक्षितरीत्या ठेवलं आहे. आमदारांच्या या प्रश्नानंतर उद्धव ठाकरेंना चिंतेनं ग्रासलं आहे. तसेच त्या आमदारांची मनधरणी करण्याचे प्रयत्नसुद्धा उद्धव ठाकरेंनी चालवले आहेत. आदित्य ठाकरे रात्री मातोश्रीवर परतणार होते, परंतु आमदारांनी व्यक्त केलेल्या प्रश्नानं आदित्य ठाकरे तिकडेच थांबले होते. ते आता हॉटेल ललितमध्येही उपस्थित आहेत. 

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरूच
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपाच्या सरकारला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असता ही याचिका खूप मर्यादित आहे, पण दोन्ही पक्ष याला विनाकारण वाढवत आहेत, असं मत न्यायमूर्तींनी व्यक्त केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात सुनावणी सुरूच राहणार आहे. 

भाजपाला 155 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं राज्यपालांनी उचललेल्या पावलाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयानं रविवारी महाविकास आघाडीच्या याचिकेची दखल घेतली असून, आज पुन्हा त्यावर सुनावणी होणार आहे. याचदरम्यान भाजपानं दावा केला आहे की, त्यांच्याकडे 155 आमदारांचं समर्थन आहे. यात भाजपाचे 105, अजित पवार समर्थक 25 आमदार आणि 15 अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. तर महाविकास आघाडीनं आमच्याकडे 161 आमदारांचं संख्याबळ असून, शिवसेना 56, काँग्रेस 44 आणि राष्ट्रवादी 53 आणि 8 अपक्ष आमदारांचा समावेश आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी लवकर राज्यपालांना या आमदारांच्या समर्थनाचं पत्र सोपवणार आहे. 

Web Title: 15 to 20 MLAs of Shiv Sena want BJP alliance with Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.