खासदार उदयनराजेंसह १५ जणांवर खंडणीचा गुन्हा; सोना कंपनीच्या मालकाला बेदम मारहाण
By admin | Published: March 24, 2017 01:39 AM2017-03-24T01:39:59+5:302017-03-24T01:39:59+5:30
लोणंद येथील सोना या लोखंडी ठोकळे बनविणाऱ्या कंपनीच्या मालकाने दोन लाखांची खंडणीसाठी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार
सातारा : लोणंद येथील सोना या लोखंडी ठोकळे बनविणाऱ्या कंपनीच्या मालकाने दोन लाखांची खंडणीसाठी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दिल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह १५ जणांवर खंडणी आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नऊ युवकांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना दि. २७ पर्यंत पोलिस कोठडी सुनावणी आहे.
अशोक कांतिलाल सावंत (वय ४६,रा. यशवंतनगर, अकलूज माळशिरस, सध्या रा. हडपसर पुणे), रणजित अमृत माने, राजकुमार कृष्णात गायकवाड, ज्ञानेश्वर दिलीप कांबळे, महेश आप्पा वाघुले, अविनाश दत्तात्रय सोनवले (सर्व रा. फलटण तालुका) आणि सुकुमार सावता रासकर व धनाजी नामदेव धायगुडे या खंडाळा तालुक्यातील युवकांचा त्यामध्ये समावेश आहे.
कंपनीचे मालक राजीवकुमार बालकिसन जैन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कंपनीतील कामगार व्यवस्थित काम करत नसल्याने कंपनी काही महिने बंद ठेवली होती. त्यामुळे ठेकेदारीवर घेतलेल्या कामगारांना काढून टाकण्यात आले. मात्र, रणजित माने यांनी फोन करून कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे लागेल तसेच कंपनी व्यवस्थित सुरू ठेवायची असेल तर दर महिन्याला दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. भीतीपोटी मी १४ महिने २ लाख रुपये दिले. हे पैसे रणजित माने घेऊन जायचे; परंतु कंपनी तोट्यात आल्याने जानेवारी आणि फेब्रुवारीत पैसे देता आले नाहीत. पोलिसांनी सर्किट हाऊसमधील घटनेच्या पूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या अनुषंगाने आणखीही पुरावे पोलिसांनी जप्त केले आहेत. (प्रतिनिधी)