विमानतळ विस्तारासाठी १५ एकर जागा
By admin | Published: May 16, 2016 02:39 AM2016-05-16T02:39:27+5:302016-05-16T02:39:27+5:30
लोहगाव येथील विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी हवाई दलाची १५ एकर जमीन एअरपोर्ट एथोरिटीला देण्याचा निर्णय घेण्यात आला
पुणे : लोहगाव येथील विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी हवाई दलाची १५ एकर जमीन एअरपोर्ट एथोरिटीला देण्याचा निर्णय घेण्यात आला
असून, विमानतळाबाहेरील रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी आवश्यक परवानग्या ३१ मेपर्यंत देण्यात येतील, अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली.
गेल्या दोन वर्षांत केलेल्या उपाययोजनांमुळे प्रवासी संख्येमध्ये तसेच विमानांच्या वाहतुकीमध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बऱ्याच वर्षांपासून विमानतळाच्याबाबतीत जे विषय प्रलंबित होते; ते प्राथमिक स्तरावर मार्गी लावण्यात आल्यामुळे ही वाढ झाली आहे. सध्या पुण्यामधून वर्षाला ५५ लाख प्रवासी विमानाद्वारे प्रवास करतात. दररोज पुण्यामधून ६६ शेड्युल्ड विमानांचे उड्डाण होते.
विमानतळाच्या विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी दुपारी लोहगाव विमातळावर पर्रिकर यांनी हवाई दल, विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार योगेश टिळेकर, जगदीश मुळीक यांच्यासह महापालिका आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते. अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. पर्रिकर म्हणाले, ‘‘पुण्याच्या विमानतळाची क्षमता वाढवण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेत काम करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने हवाई दलाला यापेक्षा जास्त तडजोड करणे अवघड आहे. हवाई दलाच्या अनेक महत्त्वाच्या आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी याठिकाणी आहेत. त्यामुळे आगामी काळात विमानतळ प्राधिकरणाला आगामी काळात एका निश्चित वेळेत नवीन विमानतळ उभारावेच लागेल. सध्याच्या विमानतळाच्या वाढीचे गणित मांडता येत नाही. तरीसुद्धा पुण्याचा होत असलेला विस्तार, उद्योग आणि मालवाहतुकीचा विचार करता तसेच प्रवाशांना सुविधा देण्यासाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.’’
विमानतळाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पुढील ३ महिन्यांत निर्णय घेऊन विस्तारीकरणाला सुरुवात करण्यात येईल. दुसरा टप्पा पूर्ण होण्याआधी नवीन विमानतळ सुरू व्हायला हवे. तर पहिल्या टप्प्यामध्ये सध्याच्या विमानतळाच्या जागेत ३० ते ४० टक्क्यांची वाढ करणार आहोत. त्यासाठी १५.८४ एकर जमीन हवाई दल विमानतळ प्राधिकरणाला भाड्याने देणार आहे.
भाडेकरारावर स्वाक्षरी होईपर्यंत काम करायला परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे काम सुरू करायला परवानगी देण्यात आली आहे. हे काम करण्यासाठी ज्या चार गोष्टींचा अडथळा येत होता त्यांच्यावर तोडगा काढण्यात आला आहे. हवाई दलाच्या डेटा तसेच अन्य महत्त्वाच्या केबल्स टाकण्यात आलेल्या आहेत; त्या हलवण्यात येणार आहेत. त्यासाठी हवाई दलामार्फत निविदा काढल्या जातील. ज्यांनी या केबल टाकल्या आहेत त्यांच्याकडूनच हे काम करून घेतले जाणार आहे.
विमानतळाबाहेरील रस्त्याच्या विस्तारीकरणाला तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यासाठी करार झालेला आहे. यापूर्वीच्या रस्त्याच्या प्रस्तावानुसार हवाई दलाच्या जमिनीचे दोन तुकडे होत होते. त्यामुळे रस्त्याची जागा बदलून देण्यात येईल. हा रस्ता विमानतळाच्या सीमेच्या बाहेरून जाणार असेल. साधारण एक महिन्याच्या आत त्याची जागा ठरवून यावर निर्णय घेण्यात येणार आहे. विश्रांतवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याला हवाई दलाने यापूर्वीच परवानगी दिली होती. परंतु, हवाई दलाच्या पाईपलाईन आणि केबल्स रस्त्याखालून जात असल्याने काम होत नव्हते. त्यासाठी पुढील महिनाभरात भुयार तयार करून केबल आणि पाईपलाईन हलवण्याचे काम करावे लागणार आहे. त्यादरम्यान रस्त्याचेही काम सुरू राहील. त्यासाठी आवश्यक परवानगी ३१ मेपर्यंत देण्यात येणार असल्याचे पर्रिकर यांनी सांगितले. तसेच विमानतळाभोवतीने सुरक्षेच्यादृष्टीने बॅरिकेड टाकले जातील. काम सुरू असताना आतील भागातील फोटो कोणी घेऊ नयेत तसेच संरक्षित भागात कोणी जाऊ नये यासाठी पत्र्याचे शेड उभारले जाईल. यासोबतच रस्त्याच्या विस्तारीकरणाची निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्यक्ष इमारतीचे काम सुरू व्हायला चार ते पाच पहिन्यांचा वेळ जाईल, असे संरक्षणमंत्री
मनोहर पर्रिकर यांनी या वेळी
बैठकीत सांगितले.
>जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी २५ आॅक्टोबर २०१५ रोजी पुण्यात बैठक घेऊन हवाई दलाने विस्तारीकरणासाठी १५ एकर जागा देण्यास मान्यता दिल्याचे सांगितले होते. काही तांत्रिक अडचणींमुळे विस्तारीकरणाचे काम रखडले होते. रविवारी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये या मुद्द्यांवर चर्चा करून तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जागा हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झाला. यासोबतच सुरक्षेच्या कारणास्तव यापुढे नागरी विमानांच्या वेळांबाबत हवाई दलाकडून सुरक्षेच्या कारणास्तव यापुढे तडजोड करणे अशक्य आहे.
- मनोहर पर्रिकर,
संरक्षणमंत्री
>संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी विमानतळ विस्तारासाठी जागा आणि रस्त्यांची पाहणी केली आहे. यासंदर्भात घेण्यात आलेली बैठक सकारात्मक झाली. पुढील काही दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी १५.८४ एकर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या विमानतळामध्ये ७-८ विमानेच उभी करता येऊ शकतात. विस्तार झाल्यानंतर आणखी ५ विमाने उतरू शकतील. विमानतळावर खासगी विमानेही उभी करण्यात आलेली आहेत. यासोबतच मालवाहू विमानांची संख्याही वाढेल. त्यासोबत प्रवासी संख्याही वाढेल. प्रवाशांना आणखी सोखसोयी उपलब्ध करून दिल्या जातील.
- गिरीश बापट,
पालकमंत्री, पुणे