राज्यात १५ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक; नाॅनकोविड सेवांचा ताण वाढल्याने रक्त तुटवडा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 11:50 AM2022-04-16T11:50:24+5:302022-04-16T11:50:55+5:30
राज्यात आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे. कोरोनाच्या तिन्ही लाटांवर यशस्वीरीत्या मात केल्यानंतर राज्यासह मुंबईतील रुग्णालयांवर नाॅनकोविड सेवांचा ताण दिवसागणिक वाढत आहे.
मुंबई :
राज्यात आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे. कोरोनाच्या तिन्ही लाटांवर यशस्वीरीत्या मात केल्यानंतर राज्यासह मुंबईतील रुग्णालयांवर नाॅनकोविड सेवांचा ताण दिवसागणिक वाढत आहे. परिणामी, यामुळे राज्यात रक्तसाठ्याची मागणी दिवसागणिक वाढत असून, सध्या केवळ १५ दिवसाचा रक्तसाठा शिल्लक आहे.
राज्यात ४९,४९५ तर मुंबईत ७,०१२ रक्त पिशव्या (युनिट) उपलब्ध असल्याने, हा रक्तसाठा पुढील १२ ते १५ पुरेल इतका असल्याने सामान्य नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरोग्य सेवा संचालक डॉ. साधना तायडे यांनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आल्यानंतर मुंबईसह राज्य निर्बंधमुक्त झाले आहे.
कोरोनाचा उद्रेक रोखण्यात यश आल्यानंतर आता नॉनकोविड रुग्णांवर वेळीच उपचार करीत लहान-मोठ्या शस्त्रक्रिया रोज होत आहेत. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर रक्ताची मागणी वाढली असून, लोकांनी पुढाकार घेत रक्तदान करणे गरजेचे आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, आपण रक्तदान केल्याने कुणाचे तरी आयुष्य वाढणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळ, दहिहंडी उत्सव मंडळ, सोसायटी, विद्यार्थी व कर्मचारी यांनी पुढाकार घेत रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.