पुणे जिल्ह्यातील १५ डी.एड. महाविद्यालये बंद; राज्यातील संख्या ६५४ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 01:34 PM2020-12-30T13:34:12+5:302020-12-30T13:36:02+5:30
गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्राकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चांगलीच रोडावली आहे.
पुणे: तब्बल दहा वर्षांपासून शिक्षक भरतीला ब्रेक लागल्यामुळे डी.एड.अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची व प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पुणे जिल्ह्यात मागील वर्षी असणाऱ्या ४४ डी.एड. महाविद्यालयांची संख्या २९ वर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात या वर्षी १५ महाविद्यालये बंद पडली.
शिक्षक होऊन विद्यार्थी घडवावेत, ज्ञान दानाचे काम करावे,अशी इच्छा बाळगून या पूर्वी अनेकांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. मात्र,गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्राकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चांगलीच रोडावली आहे. सुमारे पंधरा वर्षापूर्वी डी.एड.अभ्यासक्रमास प्रवेश मिळत नव्हता. राज्यातील १ हजार १०० डी.एड.महाविद्यालयांची संख्या २०१९-२० मध्ये ८४९ पर्यंत पोहचली. मात्र,यंदा राज्यातील महाविद्यालयांची संख्या ६५४ वर आली आहे.
---------------------------
राज्य शासनाने गेल्या काही वर्षांपासून वेतनेतर अनुदान बंद केले आहे.त्यामुळे केवळ अनुदानासाठी डी.एड.महाविद्यालये चालवली जात नाहीत.तर प्रयत्न करून आणि मोफत प्रवेश देऊनही विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याने संस्थाचालकांवर महाविद्यालये बंद करण्याची वेळ आली आहे.
---------------------------------
डी.एड.करून शिक्षक होण्याची मोठी इच्छा होती.मात्र,शिक्षक भरती न होणे आणि अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रलंबित प्रश्नामुळे माझ्यासारख्या अनेक डी.एड.पदवी धारकांनी रोजगार मिळण्याची आशा सोडून दिली आहे.सध्या मी उपजिविकेसाठी हॉटेल व्यावसाय सुरू केला आहे.
- राविंद्र बारस्कर, डी.एड.पदवीधारक
---------------------
शासनाने शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केल्यास डी.एड.अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच वाढेल.यंदा कोरोनामुळे डी.एड.प्रवेशावर परिणाम झाला आहे.नोकरी मिळण्याची शक्यता कमी असल्याने सध्या विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याचा कल कमी झाला आहे.
- प्राचार्य,वीणा खांदोडे, भास्करराव कर्वे अध्यापक विद्यालय,पुणे