महाबळेश्वर १५, तर मुंबई २३ अंश! महिन्याच्या शेवटपर्यंत उकाडा कायम राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 06:55 AM2021-10-18T06:55:39+5:302021-10-18T06:58:20+5:30
दिवाळीच्या आसपास मुंबईकरांना थंडीसाठीचे अनुकूल हवामान अनुभवता येणार
मुंबई : राज्यात रविवारी सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर १५.७ अंश, तर मुंबईचे किमान तापमन २३.८ अंश एवढे नोंद झाले आहे. मुंबई वगळता राज्यभरात सर्वत्र अवकाळी पावसाचा धिंगाणा सुरू असून, मुंबईत ऑक्टोबर हिटचे चटके बसत आहेत. हा जीव काढणारा उकाडा महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहणार असून, त्यानंतर दिवाळीच्या आसपास मुंबईकरांना थंडीसाठीचे अनुकूल हवामान अनुभवता येणार आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ, तर विदर्भात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. मराठवाड्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. १८ ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
मुंबईचे तापमान तीन अंशांनी घटणार
ऑक्टोबर हिटचा तडाखा आणखी काही दिवस राहणार आहे. दिवाळीनंतर ऋतुमानात बदल होऊन हवामानात किंचित गारवा येईल.
मुंबईत प्रामुख्याने तापमान कमी नोंदविले जात नाही. मात्र, तरीही मुंबई किमान तापमान सरासरी ३ सेल्सिअस अंशानी खाली नोंदविण्यात येईल.
दिवाळीनंतर हवामानात घसरण होईल. नाशिक, पुणे येथील किमान तापमानात बऱ्यापैकी घट होईल.
हे किमान तापमान १५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, असा अंदाज ‘वेगरीस ऑफ दी वेदर’ या संस्थेने वर्तविला आहे.