दीड लाख ग्राहकांना मिळणार 'नवप्रकाश'

By admin | Published: November 16, 2016 04:42 PM2016-11-16T16:42:37+5:302016-11-16T16:42:37+5:30

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणने 'नवप्रकाश' योजना सुरू केली आहे.

1.5 lakh customers to get 'neo-prakash' | दीड लाख ग्राहकांना मिळणार 'नवप्रकाश'

दीड लाख ग्राहकांना मिळणार 'नवप्रकाश'

Next

आप्पासाहेब पाटील

सोलापूर,दि. १६ : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणने 'नवप्रकाश' योजना सुरू केली आहे. जिल्ह्यातील सुमारे दीड लाख वीजग्राहकांना या योजनेत थकबाकीमुक्तीसोबतच नवीन वीजजोडणी घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

३१ मार्च २०१६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या उच्च व लघुदाब वीजग्राहकांसाठी महावितरणने १ नोव्हेंबरपासून 'नवप्रकाश' योजना सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्यात १ लाख ४७ हजार ५६८ वीजग्राहकांकडे ७२ कोटी १७ लाख ९५ हजार रुपयांची मूळ थकबाकी, ११ कोटी ३५ लाख ४१ हजार रुपयांचे व्याज तसेच विलंब शुल्कापोटी १ कोटी ४४ लाख ३६ हजार रुपयांची थकबाकी आहे.

'नवप्रकाश' योजनेत येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा केल्यास त्यामध्ये ५ टक्के सूट दिली जाईल तसेच व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे. १ नोव्हेंबर २०१६ ते ३१ जानेवारी २०१७ पर्यंत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ करण्यात येईल. तसेच १ फेब्रुवारी २०१७ ते ३० एप्रिल २०१७ पर्यंत मूळ थकबाकीसोबत २५ टक्के व्याजाच्या रकमेचा भरणा करावा लागणार असून, उर्वरित ७५ टक्के व्याज व १०० टक्के विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे. महावितरणच्या www. mahadiscom.in  संकेतस्थळावर संबंधित ग्राहकांच्या थकित देयकाचा तपशील व 'नवप्रकाश' योजनेत किती रक्कम भरायची याबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. थकबाकीची रक्कम धनादेशाद्वारेही स्वीकारली जाणार आहे. थकबाकीमुक्त वीजग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरित नवीन वीजजोडणी देण्यात येईल. त्यासाठी सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमधून सूट देण्यात येणार आहे. तथापि, सुरक्षा ठेवीची रक्कम वर्षभराच्या वीजवापरानुसार आर्थिक वर्षात आकारण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी वीजग्राहकांनी महावितरणच्या संबंधित शाखा वा उपविभाग कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
-----------------
पश्चिम महाराष्ट्रात पावणेसहाशे कोटींची थकबाकी
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ५ लाख ७० हजार ग्राहकांना या योजनेतून थकबाकीमुक्तीची संधी मिळणार आहे. त्यांच्याकडे ४७२ कोटी रुपयांची मूळ थकबाकी, ९८ कोटी ५८ लाख रुपयांचे व्याज तसेच विलंब शुल्कापोटी ४ कोटी ७३ लाख रुपयांची थकबाकी आहे. एकूण थकबाकी ५७५ कोटी ३१ लाख रुपये आहे.
--------------------
जुन्या नोटांनी व्हा थकबाकीमुक्त
वीजबिल भरण्यासाठी महावितरण येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारणार आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या घरगुती व वैयक्तिक ग्राहकांना जुन्या नोटा भरून थकबाकीमुक्त होण्याची ही सुवर्णसंधी आहे. तसेच ३० नोव्हेंबरपर्यंत मूळ थकबाकीत ५ टक्के सूट मिळणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी अधिक वेळ न दवडता आपली बिले भरावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे. बिल भरणा केंद्रांवर महावितरणचे कर्मचारी दिवसभर जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी ग्राहकांचे अर्ज भरून देण्यास सहकार्य करत आहेत.
-----------------
येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा केल्यास त्यामध्ये ५ टक्के सूट देण्यात येणार आहे़ या योजनेचा लाभ थकबाकीदार ग्राहकांनी घेऊन महावितरणला सहकार्य करावे़
--धनंजय औंढेकर
अधिक्षक अभियंता, सोलापूऱ

Web Title: 1.5 lakh customers to get 'neo-prakash'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.