दुबार नोंदणी असलेले साडेदहा लाख मतदार वगळले, आयोगाची कार्यवाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 12:35 PM2023-01-06T12:35:55+5:302023-01-06T12:36:28+5:30
राज्यात गेल्या वर्षी जानेवारीत ९ कोटी १३ लाख ४२ हजार ४२८ मतदार होते. मात्र, दुबार, छायाचित्र नसलेले व मृत्युमुखी पडलेल्यांची नावे वगळण्यात आली.
मुंबई : राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १० लाख ५६ हजार मतदार कमी झाले आहेत. तर, दिव्यांग मतदारांत १५ हजारांनी वाढ झाली आहे. भारत निवडणूक आयोगाने ही कार्यवाही केली.
दुबार नोंदणीच्या त्रुटी दूर करणे, मृत्युमुखी पडलेले व छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे वगळण्याबाबत निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला होता त्याअंतर्गत १०.५६ लाख मतदार कमी झाल्याची माहिती आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंत्रालयात आयोजित पत्र परिषदेत दिली.
राज्यात गेल्या वर्षी जानेवारीत ९ कोटी १३ लाख ४२ हजार ४२८ मतदार होते. मात्र, दुबार, छायाचित्र नसलेले व मृत्युमुखी पडलेल्यांची नावे
वगळण्यात आली. त्यामुळे आता राज्यातील मतदारांची संख्या ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ इतकी झाली आहे. त्यामुळे १० लाख ५६ हजार इतके मतदार गेल्या वर्षीपेक्षा कमी झाले आहेत. त्यात यंदा नव्याने ४ लाख ४३ हजार ५०० मतदारांची नोंदणी करण्यात निवडणूक आयोगाला यश मिळाले आहे, असेही देशपांडे यांनी सांगितले.
राज्यात गेल्या वर्षी ६ लाख ६२ हजार १५१ दिव्यांग मतदारांची नोंदणी होती, त्यात यंदा १५ हजार ३३२ ने वाढ झाली आहे. तर मतदान ओळखपत्रावर छायाचित्र नसल्याने ६ हजार २५७ मतदारांची नावे वगळण्यात आली.
तर २ हजारांहून अधिक मतदारांचे छायाचित्र टाकण्यात यश
मिळवल्याचे निवडणूक आयोगाने सादर केलेल्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.