१५ लाखांच्या लुटीचा १२ तासांत पर्दाफाश!
By admin | Published: July 16, 2016 03:15 AM2016-07-16T03:15:37+5:302016-07-16T03:15:37+5:30
गेवराई तालुक्यातील धोंडराई फाट्यावर स्टेट बँक आॅफ हैद्राबादची १५ लाख रुपयांची रोकड लुटल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या बारा तासांत छडा लावला
बीड : गेवराई तालुक्यातील धोंडराई फाट्यावर स्टेट बँक आॅफ हैद्राबादची १५ लाख रुपयांची रोकड लुटल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या बारा तासांत छडा लावला. शंकर दामोदर शेंडगे, ऋषीकेश श्रीहरी महानोर (दोघे रा. बागपिंपळगाव ता. गेवराई) या संशयितांना गुरुवारी रात्रीच जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून लुटीचा पूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
धोंडराई येथील एसबीएच शाखेतील रोखपाल विकासकुमार शर्मा, शिपाई दीपक मुळूक हे दोघे गुरुवारी दुपारी खासगी मिनी रिक्षामधून १५ लाखांची रक्कम लोखंडी पेटीतून घेऊन जात होते. धोंडराई फाट्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चालक किशोर खरात यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून विळ्याच्या धाकावर १५ लाख रुपयांची पेटी हिसकावून पोबारा केला होता. गुरुवारी रात्रीच त्या दोघांना पोलिसांनी उचलले. त्यांच्याकडून रोख १५ लाख, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, विळा, टोपी व टी-शर्ट जप्त करण्यात आले आहे. शेंडगे, महानोर यांनी लूट केल्यावर दुचाकीवरून थेट आपले शेत गाठले. तेथे पेटी फोडून तोडलेल्या झाडाच्या बुंद्यातील गवतात रोकड लपवून ठेवली व स्वत: शेत कामात व्यग्र झाले होते. मात्र सांगळे यांनी दिलेल्या माहितीमुळे पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले. (प्रतिनिधी)