बिबरच्या कार्यक्रमाच्या सुरक्षेचे १५ लाख बिल

By admin | Published: May 26, 2017 12:31 AM2017-05-26T00:31:13+5:302017-05-26T00:31:13+5:30

पॉप सिंगर जस्टीन बिबरच्या नवी मुंबईत झालेल्या कार्यक्रमासाठी पुरवलेल्या सुरक्षेचे पोलिसांनी १५ लाख रुपये बिल आकारले आहे.

15 million bills of security for Bibber's program | बिबरच्या कार्यक्रमाच्या सुरक्षेचे १५ लाख बिल

बिबरच्या कार्यक्रमाच्या सुरक्षेचे १५ लाख बिल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पॉप सिंगर जस्टीन बिबरच्या नवी मुंबईत झालेल्या कार्यक्रमासाठी पुरवलेल्या सुरक्षेचे पोलिसांनी १५ लाख रुपये बिल आकारले आहे. काही कार्यक्रमांच्या बंदोबस्ताची रक्कम मिळवण्यासाठी पोलिसांचा चांगलाच घाम निघालेला आहे. असाच अनुभव बिबरच्या बंदोबस्ताबाबत होऊ नये याकरिता कार्यक्रमापूर्वीच पोलिसांनी बिलाची रक्कम जमा करून घेतली आहे.
जगप्रसिद्ध पॉप सिंगर जस्टीन बिबर याचा भारतातला पहिलाच कार्यक्रम नेरुळच्या डी. वाय. पाटील स्टेडिअमवर १० मे रोजी झाला होता. बिबरचा लाइव्ह शो पाहण्यासाठी ५ हजार ते ७० हजार रुपयांपर्यंतचे तिकीट खरेदी करून देशभरातील सुमारे ३५ ते ४० हजार चाहते उपस्थित राहिले होते. तर या कार्यक्रमादरम्यान स्टेडिअममध्ये अथवा बाहेरच्या आवारात कोणताही गैरप्रकार घडू नये याकरिता नवी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. कार्यक्रमस्थळी ५०० हून अधिक पोलीस कर्मचारी तर ७५ अधिकारी बंदोबस्तावर नेमण्यात आले होते. कार्यक्रमाच्या दिवशी दुपारी १ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा हा बंदोबस्त होता. त्याशिवाय स्टेडिअमच्या प्रत्येक मार्गावर २०० हून अधिक वाहतूक पोलीस कार्यरत करण्यात आले होते. कोणतीही पूर्वकल्पना न देता बिबर स्टेडिअममध्ये कार्यक्रम सुरूअसताना वाशीतील मॉलमध्ये सहकाऱ्यांसह गेला होता. या वेळी त्याच्या सुरक्षेकरिता पोलिसांची चांगलीच धावपळ झालेली. त्यानुसार या कार्यक्रमादरम्यान पुरवलेल्या सुरक्षेचे १५ लाख रुपये बिल नवी मुंबई पोलिसांनी आयोजकाकडून आकारले आहे. ही रक्कम कार्यक्रमापूर्वीच अनामत रकमेच्या स्वरूपात जमा करून घेतलेली असल्याचे विशेष शाखा उपआयुक्त आर. बनसोडे यांनी सांगितले.
यापूर्वी डी. वाय. पाटील स्टेडिअममध्येच झालेल्या आयपीएलच्या सामन्यासाठी पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती. मात्र, या सुरक्षेचे सुमारे अडीच कोटी रुपयांचे बिल आयोजकांनी थकवले होते. असाच प्रकार बिबरच्या कार्यक्रमासाठी पुरवलेल्या सुरक्षेच्या बिल वसुलीत होऊ नये, याची खबरदारी यंदा नवी मुंबई पोलिसांनी घेतल्याचे यावरून दिसून येत आहे.

Web Title: 15 million bills of security for Bibber's program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.