१५ प्रवासी अद्यापही बेपत्ता
By admin | Published: August 8, 2016 07:25 AM2016-08-08T07:25:59+5:302016-08-08T08:15:41+5:30
सावित्री पूल दुर्घनेत बेपत्ता झालेल्या ४२ प्रवाशांपैकी २७ प्रवाशांचे मृतदेह नदी किनारी सापडले असून यापैकी १५ बेपत्ता प्रवाशांचा शोध लागला नाही आहे
Next
>सावित्री पूल दुर्घटना : शोधमोहीम मंदावली; वाहनांचाही तपास नाही
प्रशासनाने घेतली स्थानिकांची मदत
महाड : सावित्री पूल दुर्घनेत बेपत्ता झालेल्या ४२ प्रवाशांपैकी २७ प्रवाशांचे मृतदेह नदी किनार्यावर सापडले असून यापैकी १५ बेपत्ता प्रवाशांचा शोध लागला नसल्याने शोधकार्यात गेल्या पाच दिवसांपासून गुंतलेली यंत्रणा चक्रावून गेली आहे. या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या दोन एसटी बसेसह एका तवेरा जीपचा छडा अद्यापही लागला नाही. या वाहनांचा शोध घेण्यासाठी सोनार तंत्रज्ञानाचाही गेल्या दोन दिवसांपासून वापर केला जात असून या अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जात असूनही या शोधपथकाला या वाहनांचा वेध घेता येणे अशक्य झाल्याचे दिसून येत आहे.
नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या एसटी बसचा महिलांसाठी आरक्षित हा लोखंडी पत्र्याचा फलक, घटनास्थळापासून तीन ते चार किती अंतरावरील विसावा हॉटेलच्या मागील बाजूस शनिवारी सापडला तर बसच्या सिटचा भाग देखील वराठी जवळ पाण्यात वाहून जाताना सापडला.
रविवारी दिनेश सखाराम कांबळे, रमेश सखाराम मिरगल, अविनाश सखाराम मालप, जयेश गोपाळ बने हे चार मृतदेह वहूर आंबेत, वेश्वी ओवळे अशा विविध किनार्यावर आढळून आले. स्थानिक ग्रामस्थ व मच्छिमारांनी हे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून प्रशासनाच्या ताब्यात दिले.
अद्यापही तेवरा जीपमधील दत्ताराम मिरगल, जयवंत मिरगल, संतोष वाजे, आदिनाथ कांबळे व चालक दिलीप वीर हे बेपत्ता आहेत. तर एसटी बसमधील धोंडू कोकरे, जितेश जैतापकर, विलास देसाई, इस्माइल वाघू, मंगेश चव्हाण, गोविंद जाधव, राजेश कलमकर, गोरखनाथ मुंढे, अनंत मोंडे व सुरेश निकम हे प्रवासी बेपत्ता आहेत. या बेपत्ता प्रवाशांचे नातेवाईक मदत केंद्रात तपासाची प्रतिक्षा करीत गेली पाच दिवसांपासून बसलेले आहेत. (वार्ताहर)
दासगाव : सावित्री पूल दुर्घटनेतील मृतदेहांचा शोध अद्याप सुरू असून रविवारी केवळ दोनच मृतदेह सापडले असून सापडलेल्या मृतदेहांची संख्या २७ झाली आहे. काही मृतदेह नसल्याने मदत केंद्रात बसलेल्या नातेवाईकांचे डोळे पानावले आहेत. तवेरा कारमधील मृतदेह रविवारी सापडला असून त्यांची ओळख पटली आहे. दरम्यान रविवारी परिवहन मंत्री राते व खा. युवराज संभाजीराजे यांनी घटनास्थळाला भेट दिली. सावित्री पूल दुर्घटनेतील उर्वरित मृतदेहांचा आणि वाहनांचा शोध पाचव्या दिवशीही सुरूच होता. एनडीआरएफचे जवान सावित्री नदीमध्ये शोध घेत असले तरी त्यांच्या हाती अद्याप काहीच लागलेले नाही. अखेर प्रशासनाने स्थानिक ग्रामस्थांचा आधार घेतला आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून देखील वाहनांचा शोध लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दासगांव आणि परिसरातील भोई समाजाने लोकांना रविवारी प्रशासनाने मृतदेह आणि वाहनांचा शोध घेण्याकरिता नदीमध्ये पाठवले आहे. जवळपास १00 हून अधिक लोकांचे पथक दादली पुलाजवळ वाहनांचा शोध घेत आहे. घटनास्थळाजवळ मदत केंद्रात बसलेल्या नातेवाईकांना आपल्या गमावलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडत नसल्याने चिंता निर्माण झाली आहे. यातील अनेक नातेवाईकांनी प्रशासनाच्या कामावर नाराजी व्यक्त केली. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि खा. युवराज संभाजीराजे यांनी घटनास्थळाला आणि येथे जमलेल्या नातेवाईकांची भेट घेतली. या ठिकाणी सुरू असलेल्या मदत कामाची माहिती जाणून घेतली. महाड आगारात महाड परिवहन विभागाच्या वतीने श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, आ. भरत गोगावले, महामंडळाचे रिजनल मॅनेजर राहुल तोरो, महाव्यवस्थापक गोहोत्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी पवार, उपमहाव्यवस्थापक माईन हाळीकर, यंत्र अभियंता चालक मुकुंद बंडगर आदि उपस्थित होते. यावेळी दिवाकर रावते यांनी प्रवासी हे आमचे दैवत आहेत. त्यांच्यावर कोसळलेल्या दु:खात एसटी महामंडळ सहभागी असून महामंडळाच्या कर्मचार्यांनी या दुर्घटनेनंतर केलेली मदत कौतुकास्पद असल्याचे सांगितले. कर्मचार्यांच्या प्रत्येक प्रसंगात एसटी अध्यक्ष म्हणून आपण कायम पाठीशी राहू असेही स्पष्ट केले.