भोंदूबाबांची १५ हजार पोस्टर्स जप्त

By admin | Published: April 10, 2015 04:48 AM2015-04-10T04:48:33+5:302015-04-10T04:48:33+5:30

अनेक समस्या सोडविण्याचे आश्वासन देऊन भोंदूगिरी करणाऱ्या बाबांविरोधात पश्चिम रेल्वे पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे

15 thousand posters of Bhootabababan seized | भोंदूबाबांची १५ हजार पोस्टर्स जप्त

भोंदूबाबांची १५ हजार पोस्टर्स जप्त

Next

मुंबई : अनेक समस्या सोडविण्याचे आश्वासन देऊन भोंदूगिरी करणाऱ्या बाबांविरोधात पश्चिम रेल्वे पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी पश्चिम रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत भोंदूबाबांची जाहिरात करणारी १५ हजारांहून अधिक पोस्टर्स जप्त करण्यात आली. यामध्ये तीन भोंदूबाबा फरार असून, त्यांच्या आठ साथीदारांना अटक करण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
नोकरी, ताणतणावासह अनेक समस्या सोडविण्याचे आश्वासन देणारी पोस्टर्स लोकलच्या डब्यात चिकटविण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे लोकलचा डबा विद्रूप होतानाच या पोस्टर्समधील आश्वासनालाही अनेक जण बळी पडतात. त्यामुळे रेल्वे पोलिसांकडून (आरपीएफ) त्याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी अंधेरी यार्ड येथे उभ्या असलेल्या लोकलच्या डब्यात बाबांची पोस्टर्स चिकटवण्यासाठी रेहान खान, सोहेल मोहंमद, अमिष अहमद, जुबेर खान आले असता रेल्वे पोलिसांनी त्यांना तत्काळ पकडले आणि त्यांच्याकडून १,५00 पोस्टर्स जप्त केली. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे येथेही पोलिसांनी छापा टाकला असता अशाच कामांसाठी आलेल्या मोहंमद शाहरुख, दिलशाद खान, फिरोज खान, शाहरुख अली यांना अटक केली. त्यांच्याकडून नऊ बॅगा हस्तगत करण्यात आल्या असता प्रत्येक बॅगेत १,७00 ते १,८00 पोस्टर्स असल्याचे निदर्शनास आले. या सर्वांना अटक करून अंधेरी रेल्वे कोर्टात हजर केले असता प्रत्येकाला २,५00 रुपयांचा दंड आणि १६ दिवसांच्या जेलची शिक्षा सुनावण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: 15 thousand posters of Bhootabababan seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.