सहा तासात १५ हजार युनिट विजेची बचत
By admin | Published: August 11, 2014 12:54 AM2014-08-11T00:54:52+5:302014-08-11T00:54:52+5:30
सध्या संपूर्ण महाराष्ट्र वीजसंकटाचा सामना करीत आहे. लोडशेडिंगच्या नावाखाली अनेक गाव अंधारात रात्र काढत आहे. मात्र त्याच वेळी नागपुरातील एका संस्थेने विशेष उपक्रमाच्या माध्यमातून सहा तासांत
वीजसंकटावर पर्याय : ‘ग्रीन व्हिजिल’चा उपक्रम
नागपूर : सध्या संपूर्ण महाराष्ट्र वीजसंकटाचा सामना करीत आहे. लोडशेडिंगच्या नावाखाली अनेक गाव अंधारात रात्र काढत आहे. मात्र त्याच वेळी नागपुरातील एका संस्थेने विशेष उपक्रमाच्या माध्यमातून सहा तासांत १५ हजार ४११ युनिट विजेची बचत केली आहे. या उपक्रमाचे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात कौतुक केले जात आहे. ‘ग्रीन व्हिजिल’असे त्या संस्थेचे नाव आहे. ही संस्था गत अनेक वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात काम करीत आहे.
कोळशाचा मर्यादित साठा, पाण्याची टंचाई व वाढते प्रदूषण या ज्वलंत समस्या लक्षात घेता, या संस्थेने नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने गत जानेवारी २०१४ पासून शहरात हा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रात्री ८ ते ९ वाजता दरम्यान शहरातील एका भागातील पथदिवे बंद केले जातात. शिवाय संस्थेचे पदाधिकारी लोकांच्या घरोघरी फिरून वीज बचतीचे महत्त्व पटवून देतात.
यातून तब्बल ३२ हजार नागरिक या उपक्रमात सहभागी झाले आहेत. ते नागरिक आता स्वत:च्या घरातील अनावश्यक लाईट काही वेळासाठी बंद ठेवून, वीज बचतीस हातभार लावत आहे. अशाप्रकारे १५ जानेवारी २०१४ रोजी नागपुरात पहिला प्रयोग राबविण्यात आला.
यानंतर १४ फेब्रुवारी २०१४ रोजी दुसरा, १६ एप्रिल रोजी तिसरा, १५ मे रोजी चौथा, १३ जून रोजी पाचवा व १२ जुलै रोजी सहावा उपक्रम राबविण्यात आला. यातून आजपर्यंत एकूण १५ हजार ४११ युनिट विजेची बचत झाली आहे. विशेष म्हणजे, एक युनिट वीज उत्पादित करण्यासाठी साधारण ५०० ग्रॅम कोळसा व ७.५ लिटर पाणी लागते. म्हणजेच १५ हजार ४११ युनिट विजेच्या बचतीसह ७ हजार ७०६ किलो कोळसा व १ लाख १५ हजार ५८५ लिटर पाण्याची बचत झाली आहे. शिवाय १५ हजार युनिट वीज तयार करताना वातावरणात पसरणाऱ्या हजारो किलो कार्बनडाय आॅक्साईडपासूनही बचाव झाला आहे. (प्रतिनिधी)