परळीतील १५ गावांचा कायापालट !

By Admin | Published: April 7, 2017 05:28 AM2017-04-07T05:28:57+5:302017-04-07T05:28:57+5:30

युपीएल कंपनीच्या सहकार्याने स्वयंसेवी संघटनेमार्फत राबविल्या जात असलेल्या उपक्रमाला आता फळे दिसू लागली आहेत.

15 villages in Parli transformation! | परळीतील १५ गावांचा कायापालट !

परळीतील १५ गावांचा कायापालट !

googlenewsNext

मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात बळीराजाच्या मदतीसाठी युपीएल कंपनीच्या सहकार्याने स्वयंसेवी संघटनेमार्फत राबविल्या जात असलेल्या उपक्रमाला आता फळे दिसू लागली आहेत. येथील महिला स्वयंपूर्ण होऊ लागल्या असून सकस आहारामुळे बालकांच्या कुपोषणाचे प्रमाणही कमी झाले आहे.
‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ चळवळीच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या मयंक गांधी यांनी समाजहितैषी डॉ. वंगे यांंना सोबत घेऊन परळी तालुक्यातील १५ गावे दत्तक घेतली. तेथील ३० हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल घडवण्याच्या हेतूने युनायटेड फॉस्फरस कंपनीने (युपीएल) मे २०१६ मध्ये या उपक्रमाला पाठबळ दिले.
पहिल्या टप्प्यात अत्यंत धाडसी पाऊल टाकत दत्तक गावांतील दारू विक्रीचे धंदे बंद करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांना शेळी आणि कोंबड्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या सहाकार्याने परळीतून वाहणाऱ्या चार मोसमी नद्यांचे खोलीकरण करण्याचा उप्रकम हाती घेण्यात आला. तसेच पावसाळ्यातील कूपनलिका पुनर्भरणासाठी रोधी बंधारे (चेक डॅम्स) बांधण्यात आले. जैन इरिगेशनच्या माध्यमातून ठिबक सिंचनातून शेती पिकविण्याचा पर्याय दिला. काही शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने ठिबकचा पर्याय स्वीकारला. हगणदारीमुक्त मोहीमही कमालीची यशस्वी ठरली. सध्या ४० टक्के कुटुंबियांकडे स्वत:ची शौचालये आहेत. हे उद्दिष्ट १०० टक्क्यांवर नेण्याचा कंपनीचा मानस आहे.
याशिवाय गावांतील शाळा नव्याने बांधून रंगोरंगोटी करण्यात आली. शाळांमधून विद्यार्थी योगाचे धडे गिरवितात. मेज आणि खुर्ची उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एलसीडी स्क्रीन बसवून ई-लर्निंगची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. काही शाळांना संगणकही देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे क्रीडा कौशल्य विकसीत व्हावे, यासाठी फुटबॉल शिबिरांचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे, पुणे फुटबॉल क्लबचे खेळाडू त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी परळीला नियमित भेट देतात. त्यामुळेच मॅरेथॉनमधील परळीतील तरुणाईचा सहभाग प्रशंसनीय होता. पाणी बचाव आणि जलपुनर्भरण मोहिमेतही पावसाच्या पाण्याचे संर्वधन करण्याची यंत्रणाही शाळांच्या आवारात बसविण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सोयाबीनला चांगला भाव मिळावा यासाठी परळीत खरेदी केंद्र स्थापन करण्यासाठीही युपीएलने पुढाकार घेतला आहे. या सर्वांमधून शेतकरी कुटुंबांचे एकुणच राहणीमान सुधारल्याने या परिसराचा कायापालट झालेला दिसून येत आहे. परिवर्तनाचा हा यज्ञ असाच सुरू ठेवण्याचा मानस युपीएलच्या व्हाईस चेअरमन सॅन्ड्रा श्रॉफ यांनी बोलून दाखविला. (विशेष प्रतिनिधी)
>महिला सक्षमीकरणावर भर
महिलांच्या स्वयंसहायता बचत गटांना पाठबळ देण्यावर ‘यूपीएल’ने लक्ष केंद्रित केले आहे. परळीतील महिला गट पर्यावरणभिमुख पिशव्या तयार करतात. ही साधी पिशवी म्हणजे ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याचे द्योतक होय. सोयादूध, सोयादहीमुळे आहार पोषक होऊन कुपोषणाची समस्येवर मात करण्यात यश आले आहे.
- सॅन्ड्रा श्रॉफ, व्हाईस चेअरमन, युपीएल
>मुलांना रोजच्या आहारासोबत पोषक आहार देण्यासाठी त्यांच्या पालकांना सोयादूध, सोयादही तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Web Title: 15 villages in Parli transformation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.