अनंत गीते यांच्या माध्यमातून १५० कोटींचा घोटाळा
By admin | Published: October 12, 2016 06:36 AM2016-10-12T06:36:25+5:302016-10-12T06:36:25+5:30
रोहा येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या संकल्पनेतून रायगड लोकसभा मतदार संघातील आठवीच्या विद्यार्थ्यांना
अलिबाग : रोहा येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या संकल्पनेतून रायगड लोकसभा मतदार संघातील आठवीच्या विद्यार्थ्यांना आकांक्षा ट्रस्ट मार्फत पाच हजार टॅबचे वाटप, बुधवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मात्र या टॅब खरेदीकरिता केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या अखत्यारीत येणाऱ्या मोठ्या कंपन्यांचा सामाजिक उत्तर दायित्व निधी(सीएसआर)आकांक्षा ट्रस्टच्या माध्यमातून वापरण्यात येत आहे. केंद्रीय गिते यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी मंगळवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
काही महिन्यांपूर्वी मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना टॅब वाटप करुन त्यासाठी ४०० कोटी रुपये शिवसेनेने खाल्ल्याचे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेसनेच उघडकीस आणले होते. त्या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. त्याच पद्धतीने मुंबईतील या कोट्यावधी रुपयांच्या टॅब घोटाळ््याचा पुढील टप्पा शिवसेना केंद्रीय मंत्री गीते यांच्या माध्यमातून रायगडमध्ये करीत असून त्यातून किमान १५० कोटी रुपये खाण्याचा हा प्रकार असल्याचे मलिक यांनी सांगितले.
टॅब खरेदीसाठी आपल्या अधिकार क्षेत्रातील कंपन्यांचा सिएसआर वापरुन आपल्या पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री गिते यांची सीबीआय चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.
बुधवारी रोहा येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारा हा कार्यक्रम शिवसेनेचा आहे की शासकीय आहे या बाबत सुस्पष्टता नाही. अशा परिस्थितीत केंद्र शासनाचा सार्वजनिक उपक्रम असणाऱ्या केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक अतूल सोबती आणि भारत सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांचे अतिरिक्त सचिव मधुकर गुप्ता हे दोन वरिष्ठ सरकारी अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहत आहेत. राजकीय पक्षाच्या कार्यक्रमास सरकारी अधिकाऱ्यांना उपस्थित राहाता येत नाही. अशा परिस्थितीत हे दोन अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहिल्यास त्या दोघांनाही सरकारी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी करत असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री गीते यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. त्याचे स्विय्य सहाय्यक जोशी यांच्याशी संपर्क साधला असता गिते मातोश्री बंगल्यावर बैठकीत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)