देशात १५० लाख टन साखर राहणार शिल्लक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 06:39 AM2019-05-08T06:39:49+5:302019-05-08T06:40:12+5:30
सलग दुसऱ्या वर्षी भरघोस उत्पादन झाल्याने यंदाही देशात तब्बल १४७ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहील, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केला आहे.
पुणे : सलग दुसऱ्या वर्षी भरघोस उत्पादन झाल्याने यंदाही देशात तब्बल १४७ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहील, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केला आहे. राज्यात ६० लाख टन साखर शिल्लक राहील, असे सांगण्यात येत आहे. देशातील साखरेचे उत्पादन ३२२ लाख टनांवर पोहचले आहे.
गेल्या वर्षीच्या (२०१७-१८) हंगामात देशात ३२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यावेळच्या विक्रमी साखर उत्पादनामुळे देशात तब्बल १०७ लाख टन साखर शिल्लक होती. यंदाही ३२० लाख टनांवर उत्पादन पोहोचले आहे. गेल्यावर्षीच्या हंगामातही राज्यात १०७ लाख २० हजार टन साखर उत्पादित झाली होती. त्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वी आॅक्टोबर २०१८मध्ये तब्बल ५३.३६ लाख टन साखर राज्यात शिल्लक होती. यंदाच्या हंगामातही राज्यात १०७ लाख १० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. परिणामी तब्बल ६० लाख टन साखर शिल्लक राहील.
उत्तरप्रदेशात एप्रिल अखेरीस तब्बल ११२.६५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. येथील ११९ पैकी ६८ कारखाने सुरू होते. त्यामुळे येथील साखर उत्पादनात आणखी वाढ होईल. उत्तर प्रदेशापाठोपाठ दुसºया क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रातील गाळप हंगाम संपुष्टात आला आहे. कर्नाटकातील हंगामही संपला असून, येथे ३२.२० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गुजरातमध्ये ११.१९, तमिळनाडू ७.०५, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा ७.६०, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडने ५.३०, बिहार, पंजाब आणि हरयाणात अनुक्रमे ८.३५, ७.७० आाणि ६.७५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे.
यंदा ३0 लाख टनांची निर्यात
यंदा देशात ३३० लाख टन साखर उत्पादन होईल. देशांतर्गत साखरेचा खप २६० लाख टन असून, निर्यात ३० लाख टनांची होईल. यावर्षीचा आणि गतवर्षीचा शिल्लक साठ्यामुळे यंदाही १४७ लाख टन साखर शिल्लक राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली.