जीवनदायी आरोग्य योजनेत १५० नवीन शस्त्रक्रिया
By admin | Published: July 6, 2015 02:37 AM2015-07-06T02:37:00+5:302015-07-06T02:37:00+5:30
महाराष्ट्र राज्य सरकारने राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत १५० नवीन शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात येणार आहे.
मुंबई : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील (पिवळी शिधापत्रिकाधारक) आणि दारिद्र्यरेषेवरील (केशरी शिधापत्रिकाधारक) कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली आहे. या योजनेचा विस्तार करण्यात येणार असून येत्या चार महिन्यांत या योजनेत १५० नवीन शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात येणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीयूष सिंह यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, सध्या योजनेंतर्गत ९७१ शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. कर्करोग, हृदयरोग, किडनी प्रत्यारोपण इ. ३० विभागांच्या शस्त्रक्रिया या योजनेंतर्गत करण्यात येतात. येत्या काळात कॉक्लिअर इम्प्लांट (कानाच्या अंतर्भागातील नागमोडी नलिका), गुडघा प्रत्यारोपण, हीप रिप्लेसमेंट अशा शस्त्रक्रियांचा योजनेत समावेश करण्यात येणार आहे. या प्रक्रियेबाबत केईएम आणि जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांचाही सल्ला घेण्यात येत
आहे. या योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंतच्या शस्त्रक्रियांचा खर्च शासनाकडून करण्यात येतो. किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी ही मर्यादा अडीच लाख रुपयांची आहे. भविष्यात या योजनेत यकृत प्रत्यारोपणाचा समावेश यात होऊ शकतो. शस्त्रक्रियांचा आकडा वाढल्यास प्रीमियमही वाढेल. या सर्व बाबींविषयी सध्या चर्चा सुरू असल्याचे सिंह यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
या योजनेच्या विस्तारीकरणाच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे.
- डॉ.दीपक सावंत,
सार्वजनिक आरोग्यमंत्री