पश्चिम रेल्वेवरील विरार ते बॅकबे पहिल्या लोकलला १५० वर्षे पूर्ण
By admin | Published: April 13, 2017 01:24 AM2017-04-13T01:24:38+5:302017-04-13T01:24:38+5:30
बोरीबंदर ते ठाणे यादरम्यान देशातील पहिली ट्रेन धावली आणि ही ट्रेन म्हणजे लोकल सेवा अशीच काहीशी ओळख देशभरातील प्रवाशांना झाली.
मुंबई : बोरीबंदर ते ठाणे यादरम्यान देशातील पहिली ट्रेन धावली आणि ही ट्रेन म्हणजे लोकल सेवा अशीच काहीशी ओळख देशभरातील प्रवाशांना झाली. मात्र त्यानंतर पश्चिम रेल्वेवर सुरु झालेल्या विरार ते बॅकबे लोकल सेवेचा उल्लेख मात्र दिसून येत नाही. या लोकल सेवेला १२ एप्रिल रोजी १५० वर्षं पूर्ण झाली.
असा ऐतिहासिक दिवस साजरा करण्यात पश्चिम रेल्वेला मात्र वेळ मिळाला नाही.
मुंबई उपनगरीय मार्गावरील प्रत्यक्षात लोकल सेवांची नोंद ही १८६७ पासून सुरु झाली. त्यावेळी विरार ते बॅकबे दरम्यान दोन्ही दिशेला ट्रेन धावल्या होत्या आणि याच ट्रेनची प्रथम उपनगरीय लोकल अशी नोंद झाली. या ट्रेनला भाप इंजिनाव्दारे चालवण्यात आले होते. अशी विरार ते बॅकबे लोकल विरारहून ६.४५ वाजता सुटली आणि बॅकबेहून ५.३0 वाजता रवाना करण्यात आली. प्रवासा दरम्यान नीला (नालासोपारा), बसिन (वसई), पान्जो (वसईच्या दोन खाड्यांमधील अंतर), बेरेवला (बोरीवली), फादे, अंडारु (अंधेरी), सांताक्रु्रझ, बंदोरा (बांद्रा), माहिम, दादुरे (दादर) तसेच ग्रँन्ट रोड स्थानकात थांबली होती. महत्वाची बाब म्हणजे त्यावेळी दिवसभरात या लोकलचे दोनच फेऱ्या होत होत्या. पहिली लोकल ही सहा डब्यांची होती. धुम्रपान करणाऱ्यांसाठी कक्ष राखीवहोता. दुसऱ्या श्रेणीच्या डब्यातून सर्वात जास्त प्रवासी प्रवास करत होते. त्यासाठी एका फेरीचे भाडे हे ७ पैसे एवढ होते. तर तिसऱ्या श्रेणीतील प्रवाशांसाठी ३ पैसे भाडे होते. (प्रतिनिधी)
- 1867 पासून पुढील २५ वर्षात चार विरार लोकल, एक बोरीवली लोकल, २७ वांद्रे लोकल अशा फेऱ्या वाढवण्यात आल्या.
- 1900 या वर्षातील आठ वर्षात सेवांमध्ये वाढ करण्यात आली. विरार, बोरीवली, अंधेरी आणि वांद्रे स्थानकासाठी लोकल वाढू लागल्या.
- 1925 रोजी वाफेरवरील इंजिन कालांतराने बंद करण्यात आले आणि त्याऐवजी विद्युत इंजिनाचा वापर सुरु झाला.