नालेसफाईसाठी १५४ कोटी खर्च अपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:20 AM2018-04-09T02:20:47+5:302018-04-09T02:20:47+5:30
पावसाळा अगदी एका महिन्यावर येऊन ठेपल्याने, महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे जोर धरू लागली आहेत.
मुंबई : पावसाळा अगदी एका महिन्यावर येऊन ठेपल्याने, महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे जोर धरू लागली आहेत. प्रामुख्याने कंत्राट पद्धतीने करण्यात येत असलेल्या या कामांसाठी १५४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या वर्षी साधारणपणे मोठ्या नाल्यांमधून ४ लाख ९४ हजार ७३९ टन एवढा गाळ काढण्याचे अंदाजित आहे. यापैकी ७० टक्के, म्हणजे ३ लाख ४६ हजार ३१८ टन गाळ पावसाळ्यापूर्वी, तर उर्वरित ३० टक्के गाळ पावसाळ्यानंतर काढणे अंदाजित आहे, तसेच छोट्या नाल्यांमधून पावसाळ्यापूर्वी ७० टक्के म्हणजेच, २ लाख २३ हजार ५७० टन, तर उर्वरित ३० टक्के गाळ पावसाळ्यानंतर काढण्यात येणार आहे.
रेल्वे स्टेशन परिसर, मंडई, चित्रपट/नाट्यगृहे इत्यादी सर्व वर्दळीची ठिकाणे आणि पाणी साचण्याची संभाव्यता असणाऱ्या ठिकाणांपैकी जेथे मॅनहोलच्या झाकणांखाली जाळ्या लावण्याचे ठरले होते, त्या ठिकाणी जाळ्या बसविण्यात आल्याची, तसेच मॅनहोलवर झाकणे असल्याचीदेखील खात्री विभागस्तरीय सहायक आयुक्तांनी करवून घ्यावी. त्याचबरोबर, आपल्या विभागात मॅनहोलवरील झाकणांचा पुरेसा साठा असल्याची खात्री करवून घेण्याचे आदेश वेळोवेळी देण्यात आले आहेत.
दरम्यान, महापालिका क्षेत्रातील सर्व भागांत नालेसफाईच्या कामांना आता सुरुवात झाली असून, ही कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसारच पूर्ण होतील, असा विश्वास विभागस्तरीय सहायक आयुक्त व पर्जन्य जलवाहिन्या खात्यांच्या अधिकारी वर्गाने व्यक्त केला आहे.
गाळाचे वजन
करणे बंधनकारक
नाल्यांतून काढलेला गाळ वाहून नेण्यातच मोठा घोटाळा होत असल्याचे दोन वर्षांपूर्वी समोर आले. त्यामुळे गाळाचे वजन, गाळ टाकण्यात येणाºया जमिनीची सक्ती करणाºया अटी कंत्राटामध्ये समाविष्ट करण्यात आल्या. अटी मान्य नसल्याने ठेकेदारांनी गेल्या वर्षीही निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. अखेर पालिकेला बिगर शासकीय संस्थांच्या मदतीने विभाग स्तरावरील नाल्यांची सफाई करून घ्यावी लागली.
>नालेसफाई वेगात व्हावी
शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नालेसफाईची कामे वेगाने होत नसल्याच्या कारणास्तव, विविध स्तरांतून महापालिका प्रशासनावर टीकास्त्र उगारण्यात आले होते. विशेष म्हणजे राजकीय पक्षांसह स्वयंसेवा संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही पालिका प्रशासनाकडून होत असलेली नालेसफाई समाधानकारक होत नसल्याची टीका केली होती.
>पावसाळ्यात येथे साचते पाणी...
पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचून तलावसदृश्य स्थिती निर्माण होते. परिणामी, वाहतूक कोलमडण्यासह मुंबईकरांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. साचलेल्या पाण्याचा निचराही होत नाही आणि ठिकठिकाणी बसविण्यात आलेले उपसा पंप कुचकामी ठरल्याने, मुंबापुरीची ‘तुंबापुरी’ होते.
भायखळा, चिंचपोकळी, वरळी, दादर हिंदमाता, माटुंगा गांधी मार्केटसह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील सखल भाग, मुंबई आणि ठाणे शहराला जोडणाºया लाल बहादूर शास्त्री मार्गावरील कुर्ला डेपो, कमानी सिग्नल या व्यतिरिक्त विद्याविहार बस स्थानक परिसर, पश्चिम उपनगरात मिलन सब वे, अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसरासह पश्चिम उपनगरातील सखल भागासह ठिकठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हिंदमाता आणि गांधी मार्केट येथे पाणी साचल्याने पावसाळ्यात हा मार्ग पूर्णपणे ठप्प होतो.
लाल बहादूर शास्त्री मार्गावरील कुर्ला डेपो आणि कमानी सिग्नल येथे पाणी साचल्याने, या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावतो.
पश्चिम उपनगरात सांताक्रुझ येथील मिलन सबवेमध्ये साठलेल्या पावसाच्या पाण्यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक व्यवस्था कोलमडते.