११ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान सन्मान निधीचे १,५५४ कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 07:47 AM2023-05-01T07:47:35+5:302023-05-01T07:47:55+5:30
पीएम किसान सन्मान निधी; चार वर्षांत ९२.७४ कोटी परत मिळविण्यात यश
मुंबई - पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दर वर्षी सहा हजार रुपये जमा होतात. मात्र एप्रिल २०१९ पासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत सुमारे ११ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याची बाब समोर आली आहे. ही रक्कम थोडीथोडकी नसून १५५४ कोटी रुपये इतकी आहे. त्यातील केवळ ९२.७४ कोटी रुपये पुन्हा वसूल करण्यात सरकारच्या कृषी विभागाला यश आले आहे.
किसान सन्मान निधीअंतर्गत राज्यातील सुमारे १ कोटी १० लाख ५९ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. या योजनेच्या निकषानुसार आयकर भरणारी व्यक्ती, आमदार, खासदार, वकील डॉक्टर आदी या योजनेसाठी पात्र ठरत नाहीत. मात्र अशा अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसै जमा झालेले आहेत.
आतापर्यंतची वसुली
कर भरणाऱ्यांकडून ७७ लाख रुपये तर अन्य अपात्र शेतकऱ्यांकडून १५.६७ लाख रुपयांची वसुली आतापर्यंत करण्यात आली आहे.
७/१२ वर करणार थकबाकीची नोंद
नोटिसा पाठवूनही या शेतकऱ्यांकडून दाद दिली जात नसल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीच्या ७/१२ वरच पैशांच्या थकबाकीची नोंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे बँकांकडून कर्ज घेताना तसेच जमिनीचे कोणतेही व्यवहार करताना या शेतकऱ्यांना पैसे जमा करूनच पुढचे व्यवहार करता येणार आहेत.
खात्यात पैसेच नाहीत
सरकारने यासाठी संबंधित अपात्र शेतकऱ्यांना पैसे परत करण्यासाठी नोटिसा पाठवल्या. पैसे जमा झालेल्या खात्यांतून पैसे वळते करण्याचे निर्देश बँकांनाही देण्यात आले. मात्र असे केले असता बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यात शून्य शिल्लक असल्याचे दिसून आले.
ई केवायसीमुळे घटली संख्या : केंद्र सरकारकडून सन्मान निधीचा १४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी सक्ती असल्याने शेतकऱ्यांची संख्या ८० लाखांपर्यंत खाली आली आहे.
वसुलीचे काम हाती : अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याची बाब कृषी विभागाच्या निदर्शनास आली आहे. आता खात्यावर गेलेली ही रक्कम पुन्हा वसूल करण्याचे काम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे.