१६ संचालक, अधिकाऱ्यांना तुरुंगवास
By admin | Published: February 8, 2017 05:13 AM2017-02-08T05:13:45+5:302017-02-08T05:13:45+5:30
राज्यभर गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मंगळवारी येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वी.म.सुंदाळे यांनी १६ जणांना दोषी
अंबाजोगाई : राज्यभर गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मंगळवारी येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वी.म.सुंदाळे यांनी १६ जणांना दोषी ठरवत प्रत्येकी पाच वर्षे तुरुंगवास व ६० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तर तिघे गुन्हा नोंद झाल्यापासून फरार असून उर्वरित १५ जणांना न्यायालयाने निर्दोष ठरविले. शिक्षा झालेल्यांमध्ये माजी अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांच्यासह आठ संचालक व बँक अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
बीड जिल्हा बँकेतर्फे २ कोटी ७५ लाख ५० हजार रुपयांचे बेकायदेशीर कर्जवाटप केल्याचे हे प्रकरण आहे.
घाटनांदूर येथील शेतकरी सहकारी तेलबिया कृषी प्रक्रिया संस्थेस या बँकेने २०११ साली २ कोटी ७५ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज प्रकरण मंजूर केले होते. या कर्ज प्रकरणाचे विभागीय लेखा परीक्षक रवींद्र गोदाम यांनी लेखा परीक्षण केले. त्यात प्रक्रिया संस्थेने बोगस सभासद दाखवून कर्ज उचलून बँकेची फसवणूक केल्याचे समोर आले. गोदाम यांनी ३० जून २०११ रोजी ग्रामीण ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ३४ जणांवर फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार करून विश्वासघात केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल झाला होता.
प्राथमिक तपास अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक बी.आर. गित्ते यांनी केला. उच्च न्यायालयाने एसआयटीमार्फत तपासाचे आदेश दिल्यानंतर उपअधीक्षक स्वाती भोर यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या संस्थेस कर्ज देताना बँकेच्या अध्यक्षांनी उपकर्ज समितीतील ८ सदस्यांची बैठक ही बँकेच्या मुख्यालयातील मंथन या सभागृहात न घेता नायगाव येथील शासकीय विश्रामगृहात घेतली असल्याचे स्पष्ट झाले होते. ही बैठक केवळ कागदोपत्रीच असावी, असा जबाब कर्ज उपसमितीचे सदस्य विलास सोनवणे व विलास बडगे यांनी दिला होता. न्यायालयाने ५१ साक्षीदारांची तपासणी केली. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
पाच जणांनी उचलले २ कोटी ७५ लाख
२ कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम संस्थेच्या घाटनांदूर शाखेच्या नावावर मंजूर झाली. घाटनांदूर येथील शाखाधिकाऱ्यांनी ही रक्कम देण्यास नकार दर्शविल्याने परळीच्या शाखेतून ही रक्कम केदारेश्वर स्टील इंडस्ट्रीजचे जनार्दन डोळे (५५ लाख), रंगनाथ देसाई (४१ लाख ४० हजार), सुनील मसवले (४५ लाख), रमेश मुंडे (४५ लाख) यांनी ही सर्व रक्कम संस्थेच्या खात्यावरून स्वत:च्या ताब्यात घेतली व संस्थेच्या पैशाचा अपहार केला. म्हणून या पाच जणांचाही आरोपींमध्ये समावेश आहे.
जामिनासाठी भरले १ कोटी २० लाख रुपये
बँक घोटाळा प्रकरणात एकूण ३४ जणांवर गुन्हे दाखल झाले होते. यातील ३१ आरोपींना अटक झाली होती. त्यांच्याकडून जामिनासाठी उच्च न्यायालयाने १ कोटी २० लाख रुपयांची रक्कम भरून घेतली होती. या रकमेचा भरणा झाल्यानंतरच या सर्व आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला होता. प्रभू गुट्टे, सतीश जायभाये व अशोक बहिरवाल हे तीन आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत. घोटाळा प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने अॅड. अशोक कुलकर्णी यांची विशेष अभियोक्ता म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी ५० साक्षीदार तपासून सबळ पुरावे न्यायालयासमोर सादर केले.