बाईक अपघातात १६ महिन्यांत ३४८ जणांचा मृत्यू
By admin | Published: May 22, 2016 04:33 PM2016-05-22T16:33:34+5:302016-05-22T16:41:33+5:30
गेल्या १६ महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात सोळाशेहून अधिक अपघात झाले
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 22- नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परंतु त्याचे पालन न झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. गेल्या १६ महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात सोळाशेहून अधिक अपघात झाले आणि यात ३४८ नागरिकांना जीव गेलाय तर गेल्या १६ महिन्यांत वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७९ हजारहून अधिक नागरिकांना दंड करण्यात आला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपुरातील वाहतुकीसंदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. नागपुरात घडलेले गुन्हे, दंडातून प्राप्त झालेला महसूल, हेल्मेट कारवाई, अपघातांत झालेले मृत्यू इत्यादी प्रश्न उपस्थित करण्यात आले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१५ ते ३० एप्रिल २०१६ या कालावधीत नागपुरात १ हजार ६७१ अपघात झाले. यात ३५८ नागरिकांचा मृत्यू झाला तर १ हजार ७२८ नागरिक जखमी झाले.
डोक्याला मार लागून झालेल्या मृत्यूची माहितीच नाही
गेल्या काही महिन्यांपासून हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्यांविरोधात कारवाईचे प्रमाण वाढीस लागले आहे. हेल्मेट न घातलेल्या ७९ हजार ७७७ नागरिकांवर कारवाई करण्यात आली व यातून १३ लाख ७३ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कालावधीत झालेल्या अपघातांमध्ये नेमक्या किती नागरिकांचा डोक्याला मार लागून मृत्यू झाला याची मात्र वाहतूक विभागाकडे कुठलीही माहिती उपलब्ध नाही.
हेल्मेटप्रकरणी २५२ पोलिसांवर कारवाई
१ जानेवारी २०१५ ते ३० एप्रिल २०१६ या कालावधीत २५२ पोलिसांवर हेल्मेट न घातल्याबाबत कारवाई करण्यात आली. यासंदर्भात २५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नागरिकांवर कारवाई करत असताना पोलीसांकडून नियमांचे पालन का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.