मुंबईत सहा महिन्यांत स्वाइनचे १६ बळी
By admin | Published: June 24, 2017 04:21 AM2017-06-24T04:21:03+5:302017-06-24T04:21:03+5:30
यंदा स्वाईन फ्लूचा प्रार्दुभाव अधिक वाढत असल्याचे दिसून आले आहे. जानेवारी ते २२ जून २०१७ पर्यंत मुंबई शहर-उपनगरात स्वाईन फ्लूमुळे एकूण १६ मृत्यू ओढावले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यंदा स्वाईन फ्लूचा प्रार्दुभाव अधिक वाढत असल्याचे दिसून आले आहे. जानेवारी ते २२ जून २०१७ पर्यंत मुंबई शहर-उपनगरात स्वाईन फ्लूमुळे एकूण १६ मृत्यू ओढावले आहेत. त्यातील ६ रुग्ण मुंबई बाहेरील होते. तसेच, १३ ते २२ जून या कालावधीत तीन रुग्णांचा स्वाईन फ्लूने बळी गेल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली.
२००९ मध्ये साथ स्वरुपात आलेल्या ‘एच 1-एन 1’ हा विषाणू आता वातावरणाचा अविभाज्य भाग झाल्याने साथीच्या रोगाप्रमाणे दिसून येत आहे. मुंबई महानगर पालिकेच्या साथ रोग नियंत्रण कक्षात प्राप्त माहितीनुसार, जून महिन्यात मागील महिन्यांच्या तुलनेत अधिक स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. वातावरणात होणारे बदल व दैनंदिन कमाल आणि किमान तापमानात आढळून येणारी तफावत यामुळे फ्लू विषाणूच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे हा आजार बळावत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
गेल्या आठवड्यातील स्वाईन फ्लूच्या बळीनंतर पालिकेतर्फे करण्यात आलेल्या कारवाईत धारावीत ५०० घरांचे व २६१४ लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या परिसरात ४ रुग्णांना स्वाईन फ्लू सदृश लक्षणे आढळली, त्यांच्या उपचार सुरु आहेत.
त्याचप्रमाणे, मानखुर्द परिसरात ४७५ घरांचे व १३८४ लोकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले, येथे कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. तर मालवणी परिसरात ४९२ घरांचे २४६९ लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करण्यात आले, त्यापैकी केवळ एका व्यक्तीत स्वाईन फ्लू सदृश लक्षणे आढळली. त्याच्यावर पुढील उपचार सुरु आहेत.
७ महिन्यांच्या गर्भवतीचा बळी
धारावी येथील ७ महिन्यांच्या गर्भवती असणाऱ्या महिलेला ८ जूनपासून ताप, खोकला, श्वासास त्रास व घसा दुखणे असा त्रास होत होता. ११ जून रोजी तिला पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. १३ जून रोजी तिचा स्वाईनमुळे मृत्यू झाला. याशिवाय, मानखुर्द येथील ४५ वर्षीय व्यक्तीला ८ जूनपासून ताप, श्वासास त्रास आणि खोकल्यातून रक्त असा त्रास उद्भवला होता, त्या व्यक्तीस क्षय रोग होता. ११ जून रोजी त्या व्यक्तीस पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले, १६ जून रोजी स्वाईन फ्लूमुळे बळी गेला. मालवणी येथील ३५ वर्षीय महिलेचाही स्वाईन फ्लूमुळे १८ जून रोजी मृत्यू ओढावला
गेल्या वर्षी एकही मृत्यू नाही : २०१६ साली मुंबईत स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले होते, परंतु एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. त्यापूर्वी २०१५ साली स्वाईन फ्लूचे ३ हजार २९ रुग्ण आढळले होते. त्यातील ५२ रुग्णांचा बळी गेला होता. मात्र २०१७ साली जानेवारीपासून मुंबईत स्वाईन फ्लूने डोकेवर काढण्यास सुुरुवात केली.
गेस्ट्रोचे रुग्णही वाढले : गेल्या आठवड्याभरात गेस्ट्रोच्या रुग्णांमध्येही वाढ झाली. मुंबईत एप्रिल महिन्यातच गॅस्ट्रोचे ९१६ रुग्ण आढळले, तर या वर्षी जानेवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत २२८० रुग्णांची नोंद केली गेली. गॅस्ट्रोची लागण झाल्यास अन्नावरील वासना उडणे, उलट्या होणे, वारंवार शौचास होणे अशी लक्षणे दिसतात. अतिसारावर घरगुती उपाय म्हणजे मीठ-साखरेचे पाणी रुग्णास देणे. त्याचबरोबर रुग्णाच्या आहारात सफरचंद, मऊ भात, दही यांचा समावेश असावा. ७२ तासांच्या आत त्रास थांबला नाही तर त्वरित डॉक्टरांकडे जावे.