राणा दाम्पत्याच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ घालणाऱ्या 16 शिवसैनिकांची जामिनावर सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 12:42 PM2022-04-25T12:42:38+5:302022-04-25T12:44:01+5:30
Navneet Rana And Ravi Rana: शेकडोच्या संख्येने आलेल्या शिवसैनिकांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून राणांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला होता.
मुंबई: 'मातोश्री'वर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान केल्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याचे खार येथील निवासस्थान गाठतं प्रचंड गोंधळ घातला होता. शेकडोच्या संख्येने आलेल्या शिवसैनिकांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून राणांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला होता. त्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 16 शिवसैनिकांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
#UPDATE | Maharashtra: The 16 Shiv Sena workers who were arrested by Khar Police y'day, have been granted bail by the Court today. All of them have been released
— ANI (@ANI) April 25, 2022
They were arrested following a ruckus outside the residence of Amravati MP Navneet Rana & her husband MLA Ravi Rana
मुंबईतील खार परिसरात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राण यांच्या घराबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या 16 कार्यकर्त्यांना अटक केली होती. घोषणाबाजी करुन जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या शिवसैनिकांविरुद्ध खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पण, आता या गुन्ह्यांतील 16 शिवसैनिकांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गुन्हा जामीनपात्र असल्याने त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
राणा दाम्पत्याची हायकोर्टात धाव
दरम्यान, सामाजिक तेढ निर्माण करणारे विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी राणांनी याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी तातडीने सुनावणी घेण्याची विनंतीदेखील केली आहे. त्यांच्या या याचिकेवर आज दुपारी 2.30 वाजता सुनावणी होणार आहे.