ठाण्यात १६ आॅक्टोबरला मराठा मोर्चा

By admin | Published: September 26, 2016 03:47 AM2016-09-26T03:47:16+5:302016-09-26T03:47:16+5:30

कोपर्डी अत्याचारातील दोषींना फाशी व्हावी आणि मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघत असतानाच १६ आॅक्टोबरला ठाण्यात मराठा मूक मोर्चा काढला जाणार आहे.

16 th October Maratha Morcha in Thane, Thane | ठाण्यात १६ आॅक्टोबरला मराठा मोर्चा

ठाण्यात १६ आॅक्टोबरला मराठा मोर्चा

Next

ठाणे : कोपर्डी अत्याचारातील दोषींना फाशी व्हावी आणि मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघत असतानाच १६ आॅक्टोबरला ठाण्यात मराठा मूक मोर्चा काढला जाणार आहे. त्यात सर्व नेते मंडळी केवळ मराठा म्हणून सहभागी होतील, असे रविवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये आयोजित मेळाव्यात जाहीर करण्यात आले.
या मूक मोर्चाला ठाण्यातील मुस्लिम, पटेल, रजपूत या समाजांनीही पाठिंबा जाहीर केला. या बैठकीला दोन ते तीन हजार मराठा बांधव उपस्थित होते. मोर्चात तब्बल ३० लाख मराठा सहभागी होणार असल्याचा दावा मेळाव्यात करण्यात आला. मोर्चाची सुरु वात तीनहातनाका सिग्नल चौकातून होणार आहे, तर समारोप ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्या लाखोंच्या जनसमुदायामुळे व्यवस्था कोलमडू नये, यासाठी मोर्चादिनी टोलनाके टोलमुक्त करावेत तसेच रेल्वेने विशेष लोकल सोडाव्या आणि त्या दिवशी मेगाब्लॉक रद्द करावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी विविध नियोजन समित्या स्थापन केल्या असून प्रत्येक मोर्चेकऱ्याने भगवा ध्वज, पाण्याची बाटली व खाणे सोबत आणावे. तसेच मोर्चात सहभागी होणाऱ्या सर्वांनी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून शिस्तीचे पालन करावे, अशा सूचना उपस्थित वक्त्यांनी दिल्या. या मेळाव्याला खा.डॉ. श्रीकांत शिंदे, खा. राजन विचारे, ठाण्याचे महापौर संजय मोरे, विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार रवींद्र फाटक यांच्यासह जिल्ह्यातील अनेक सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. 

कोंडी टाळण्यासाठी नियोजन
वरसावे पुलाच्या दुरुस्तीमुळे ठाण्यात होत असलेल्या वाहतूककोंडीचा परिणाम १६ आॅक्टोबरच्या भव्य मराठा मूक मोर्चावर होऊ नये, यासाठी नियोजन सुरू आहे. मराठा समाजातील नेते,लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांनी कोंडी टाळण्यासाठी कंबर कसली आहे. मराठा मोर्चा नियोजन समितीने त्यात लक्ष घातले आहे.
सूचनांना भरघोस प्रतिसाद
च्नियोजनाच्या बैठकीत समितीने उपस्थित बांधवांकडून मोर्चासंदर्भात सूचना मागितल्या होता. त्या सूचनांनाही उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसत होते.

डोंबिवलीतही बैठक
मोर्चाची तारीख जाहीर झाल्यावर पूर्वतयारी म्हणून सायंकाळी डोंबिवलीमध्ये मराठा समाजाची विशेष बैठक हितवर्धक मंडळात पार पडली. यावेळी मराठा समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध ठिकाणी बैठकांना गर्दीहोणार आहेत. पूर्वतयारीसाठी सर्वांनी कंबर कसली आहे.

वाहने आणू नयेत
मोर्चाच्या दिवशी वाहतूककोंडी टाळण्यासाठी डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा भागांतील लोकांनी वाहने आणू नयेत. मराठाबांधवांनी या दिवशी लोकलने प्रवास करून मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन नियोजन समितीने केले.

असा असेल मोर्चाचा मार्ग
तीनहातनाका-हरिनिवास सर्कल-गजानन महाराज चौक-साईकृपा हॉटेल-नौका विहार-शिवाजी पथमार्गे-शासकीय विश्रामगृह.
मेगाब्लॉक रद्द?
मोर्चाच्या दिवशी रविवार असल्याने त्या दिवशीचा मेगाब्लॉक रद्द करावा, असे आवाहन रेल्वेला करण्यात आले. त्यासाठी खासदारांनी प्रयत्न करावे, असेही सांगण्यात आले.

Web Title: 16 th October Maratha Morcha in Thane, Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.