५ महिन्यांत राज्यात १६ वाघांचा मृत्यू; विधानसभेतील तारांकित प्रश्नावर वनमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 09:34 AM2024-07-01T09:34:53+5:302024-07-01T09:36:26+5:30

वन्यप्राण्यांबाबत गुन्हे प्रकरणांची अद्ययावत माहिती ठेवण्याकरिता नागपूर येथे वन्यजीव गुन्हे कक्ष सुरू केले आहे.

16 tigers die in state in 5 months; Forest Minister's information on the starred question in the Legislative Assembly | ५ महिन्यांत राज्यात १६ वाघांचा मृत्यू; विधानसभेतील तारांकित प्रश्नावर वनमंत्र्यांची माहिती

५ महिन्यांत राज्यात १६ वाघांचा मृत्यू; विधानसभेतील तारांकित प्रश्नावर वनमंत्र्यांची माहिती

मुंबई - राज्यात जानेवारी ते मेपर्यंत १६ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी विविध कारणांमुळे एकूण ५१ वाघांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत यंदा वाघांच्या मृत्युमुखी होण्याचे प्रमाण चिंताजनक मानले जात आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात ही बाब समोर आली आहे.

राज्यातील शेतपिकांच्या सुरक्षिततेसाठी बसविलेल्या विजेच्या तारांमध्ये अडकून मोठ्या प्रमाणात वाघांचा मृत्यू झाल्याबाबत आमदार किशोर जगताप, जयश्री जाधव, रईस शेख, चेतन तुपे  आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला दिलेल्या  लेखी उत्तरात वनमंत्री मुनगंटीवार यांनी माहिती दिली. 

या कारणांमुळे मृत्यू
राज्यात २०१८ ते मे २०२४ या कालावधीत विद्युत प्रवाहामुळे २२ वाघांचा मृत्यू झाला आहे, तर जानेवारी २०२४ ते २० मे २०२४ पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिकरीत्या ८, अपघाताने २, विद्युत प्रवाहामुळे १ आणि मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू असलेल्या ५ अशा एकूण १६ वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

वन्यजीव गुन्हे कक्ष बळकट करणार
वन्यप्राण्यांबाबत गुन्हे प्रकरणांची अद्ययावत माहिती ठेवण्याकरिता नागपूर येथे वन्यजीव गुन्हे कक्ष सुरू केले आहे. या कक्षाला बळकट करण्याची घोषणा मुनगंटीवार यांनी केली. त्याशिवाय मेळघाट व्याघ्र प्रकल्पात तयार केलेल्या सायबर सेलच्या माध्यमातून शिकाऱ्यांचा शोध घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: 16 tigers die in state in 5 months; Forest Minister's information on the starred question in the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ