१६ वर्षीय मुलगी गर्भवती, गर्भपातास उच्च न्यायालयाचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 04:34 AM2017-10-14T04:34:17+5:302017-10-14T04:35:02+5:30
सत्तावीस आठवड्यांची गर्भवती असलेल्या १६ वर्षीय मुलीला गर्भपात करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. नकार देताना उच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या पॅनेलने सादर केलेल्या अहवालाचा आधार घेत म्हटले की
मुंबई : सत्तावीस आठवड्यांची गर्भवती असलेल्या १६ वर्षीय मुलीला गर्भपात करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. नकार देताना उच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या पॅनेलने सादर केलेल्या अहवालाचा आधार घेत म्हटले की, गर्भपाताला परवानगी दिल्यास मुलीच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.
मुलीचा गर्भपात करण्यास परवानगी देण्यासाठी तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे होती.
गुरुवारी आठ डॉक्टरांच्या पॅनेलने मुलीच्या तब्येतीची तपासणी केली. पॅनेलमध्ये केईएम रुग्णालय व जी.एस. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांचा समावेश होता. आता या टप्प्यावर मुलीचा गर्भपात केला तर तिच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकेल, असे डॉक्टरांच्या पॅनेलने अहवालात म्हटले आहे. तर मुलीच्या वडिलांनी मुलीचा गर्भपात करून दिला नाही तर तिच्या जिवाला धोका निर्माण होईल व तिची मानसिक स्थितीही बिघडेल, असे याचिकेत म्हटले आहे.
‘मुलगी अशक्त असल्याने तिची तब्येत वारंवार बिघडते. त्यातच बलात्कारामुळे आलेले गर्भारपण व त्यातून जन्माला आलेले मूल वाढविणे, हे मुलीच्या मानसिक आरोग्यासाठीही धोकायदायक आहे. सन्मानाने आयुष्य जगणे, हा मुलीला घटनेने बहाल केलेला अधिकार आहे. इच्छा नसतानाही एका अल्पवयीन मुलीवर हे गर्भारपण लादण्यात येत आहे, तिच्या अधिकाराचा भंग करण्यात येत आहे,’ असा युक्तिवाद वडिलांच्या वकिलांनी न्यायालयात केला.
मात्र, न्यायालयाने मेडिकल बोर्डाच्या मताच्या विरुद्ध जाण्यास नकार दिला आहे. मेडिकल बोर्डाचे मत दुर्लक्षित करता येण्यासारखे नाही. ‘कायद्यानुसार, २० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपात करण्यास मनाई आहे. केवळ अपवादात्मक स्थितीतच परवानगी दिली जाऊ शकते,’ असे खंडपीठाने म्हटले.
मुलीने गर्भपात केला तर तिच्या जिवाला धोका आहे. या धोक्याकडे डोळेझाक करता येणार नाही. शिवाय ही अल्पवयीन मुलगी बाळाला जन्म देऊ शकते, असा निष्कर्ष डॉक्टरांच्या पॅनेलने काढला आहे, असे न्यायालयाने याचिकेच्या सुनावणीदरम्यान अल्पवयीन मुलीच्या वडिलांना सांगितले.
कायदेशीररीत्या अल्पवयीन मुलीला किंवा तिच्या पालकांना मुलाला वाढविण्याची इच्छा नसेल तर त्यांना जबरदस्ती करता येणार नाही. मुलगी किंवा तिचे पालक हे त्या मुलाला दत्तक देऊ शकतात, अशी सूचनाही मेडिकल बोर्डाने अहवालात केली आहे.
तक्रारीनुसार, आॅगस्टमध्ये मुलीच्या कुटुंबीयांनी एका स्थानिक डिलिव्हरी बॉयविरुद्ध ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या मुलाने अल्पवयीन पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर तो फरार झाला. मात्र, त्यानंतर मुलीची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळी मुलगी गर्भवती असल्याचे निदान डॉक्टरांनी केले.
पीडितेचा गर्भ २७ आठवड्यांचा आहे. पीडितेच्या प्रकृतीचा विचार करत तिला वैद्यकीय व मानसिक आधार देऊन गर्भधारणा सुरू ठेवण्याचा सल्ला देणे योग्य असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.
त्या मुलीला कमी प्रमाणात अॅनिमिया आहे, मात्र तो उपचारांती बरा होऊ शकतो. तसेच, वजनाप्रमाणे बाळ जगण्याची शक्यताही ८० टक्के आहे. या सर्व परिस्थितीमुळे प्रसूतीनंतर कुटुंबाची इच्छा असल्यास योग्य प्रक्रियेअंती बाळ दत्तक देता येईल, अशी सूचना मेडिकल बोर्डाने दिली असल्याची माहिती डॉ. सुपे यांनी दिली.