१६ वर्षांत तिकीट कलेक्टर बनले कलेक्टर

By admin | Published: October 11, 2016 08:50 AM2016-10-11T08:50:44+5:302016-10-11T08:52:58+5:30

१६ वर्षांपूर्वी तिकीट कलेक्टर असणारे जी. श्रीकांत अथक मेहनतीच्या जोरावर आता अकोल्याचे कलेक्टर बनले आहेत.

In 16 years, the collector became a ticket collector | १६ वर्षांत तिकीट कलेक्टर बनले कलेक्टर

१६ वर्षांत तिकीट कलेक्टर बनले कलेक्टर

Next
अकोला, दि. ११ - रेल्वेच्या प्रवासात एक ना अनेक समस्यांना प्रवाशांना तोंड द्यावे लागते. अशाच एका प्रवासामध्ये एका प्रवाशाला टॉयलेट स्वच्छ नसल्याचे दिसल्यावर तो भडकला. रेल्वेवरील राग काढण्यासाठी त्याने त्या बोगीमधील टीसी अर्थात तिकीट कलेक्टरला फैलावर घेतले. टीसीने त्यांना समाजविण्याचा प्रयत्न केला व सध्या दुसरे वापरा पुढच्या स्टेशनवर ते स्वच्छ केले जाईल, अशी व्यवस्था करतो, असेही सांगितले; पण तो प्रवासी ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे 'त्या' टीसीने आपला काळा कोट काढत स्वत:च टॉयलेटचा फ्लॅश सुरू करून टॉयलेट स्वच्छ करण्याचा पवित्रा घेतल्यावर आतापर्यंत वाद घालणारा प्रवासीसुद्धा वरमला. या तिकीट कलेक्टरचे ते जगावेगळे वागणे पाहून सारेच आश्‍चर्यचकित झाले. आताही अनेक लोक त्यांचे वागणे पाहून असेच अचंबित होतात. फरक फक्त एवढाच आहे, की १६ वर्षांपूर्वी तिकीट कलेक्टर असणारी ती व्यक्ती आता मात्र अकोल्याची कलेक्टर आहे. होय! आश्‍चर्य वाटलं असेल ना? पण हे खरे आहे. अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे असेच जगावेगळे रसायन. कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्याच्या जवळगेरा या गावात अतिशय सामान्य कुटुंबातील जी. श्रीकांत हे त्यांच्या गावातील पहिले सरकारी कर्मचारी. ते सामान्य जनतेसाठी कधीही, कुठेही व केव्हाही उपलब्ध असतात. लोकांमध्ये मिसळून काम करतात. अकोला जिल्हा समजून घेण्यासाठी कुणालाही न सांगता त्यांनी सायकलवरून प्रवास करीत अनेक तालुक्यांना भेटी दिल्या. 
केवळ लक्षवेधी वर्तन करून लोकप्रिय होण्याचा हा फंडा नाही. कारण ते त्यांच्या कामातही चोख आहेत. झीरो टेंडन्सी, तत्काळ निर्णय, स्पॉट व्हिजिट यावर त्यांचा सर्वाधिक भर असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाला गतिमानता आली आहे. 
प्रशासकीय कामात चोख, प्रामाणिक व शिस्तप्रिय अधिकारी ही त्यांची ओळख असली, तरी संवेदनशीलता या गुणांची सर्वाधिक चर्चा होते. त्यांच्या कार्यालयातील कुठल्याही कर्मचार्‍याने चूक केली, तर त्याला आधी समज दिली जाते. ती चूक जर शो कॉज देण्याएवढी गंभीर असेल तर ते शो कॉज देत नाहीत; मात्र त्या कर्मचार्‍याला त्याच्या घरातील सदस्यांना बोलावून आणायला सांगतात आणि त्यांच्याकडून आमच्या कुटुंब प्रमुखाची भविष्यात चूक होणार नाही, असे लेखी घेतात. खरंतर हा प्रकार एखाद्या शाळेतील विद्यार्थ्याने केलेल्या चुकीमुळे पालकांना बोलावून आणण्यासारखा आहे; मात्र या पद्धतीमुळे कर्मचार्‍यांवर नैतिक धाक निर्माण झाला आहे. सस्पेंड करणार नाही; पण चूक झाली तर सोडणारही नाही. या त्यांच्या कृतीने कर्मचारी सरळ झाले आहेत.
 
जिल्हाधिकार्‍यांचे मल्हार नृत्य !
 
 अकोल्यातील परिचारिकांनी आयोजित केलेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हाधिकारी म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले अन् त्यांनी चक्क डान्स करून या सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगत वाढविली. तो व्हिडिओ गेल्या सहा महिन्यांपासून सोशल मीडियावर सतत व्हायरल होत आहे. यावर बर्‍या-वाईट प्रतिक्रिया उमटल्या; पण श्रीकांत यांना त्याची पर्वा नाही. जिल्हाधिकारी असलो म्हणून काय झाले, मीपण माणूसच आहे ना, मला जे चांगले वाटते, ज्यामधून वाईट संदेश जात नाही, उत्साह वाढतो, माणसं जुळतात अशा वागण्याबोलण्यात चुकीचे ते काय? असा प्रतिसवाल ते नेहमीच उपस्थित करतात.
 
 
मी काहीच वेगळं करीत नाही हो ! जे चांगलं वाटते ते केलं पाहिजे, अशी माझी धारणा आहे. समाजसेवक कुठलाही मोबदला न घेता लोकांची सेवा करतात. मला तर लोकांची सेवा करण्यासाठी पगार मिळतो. मग मी लोकांसाठी त्यांच्यामधीलच एक होऊन कामाची पद्धत निर्माण केली तर बिघडले कुठे, लोकांचा सहभाग व प्रतिसाद शासकीय कामांमध्ये वाढला, तर प्रश्न सुटण्यास मोठी मदत होते. माझा प्रयत्न तोच आहे. त्यामुळे कोण काय बोलेल, याची चिंता न करता चांगलं ते करीत राहणे, यावर माझा भर आहे.
- जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी, अकोला. 
 

 

Web Title: In 16 years, the collector became a ticket collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.