पनवेलच्या रणांगणात १६० कोट्यधीश उमेदवार

By Admin | Published: May 15, 2017 12:49 AM2017-05-15T00:49:31+5:302017-05-15T00:49:31+5:30

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तब्बल १६० उमेदवार कोट्यधीश असल्याचे निदर्शनास आले आहे. भाजपाचे परेश रामशेठ ठाकूर यांच्याकडे सर्वाधिक ९५ कोटी ४७ लाख रूपयांची मालमत्ता आहे.

160 crore candidate in Panvel battleground | पनवेलच्या रणांगणात १६० कोट्यधीश उमेदवार

पनवेलच्या रणांगणात १६० कोट्यधीश उमेदवार

googlenewsNext

नामदेव मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पनवेल महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तब्बल १६० उमेदवार कोट्यधीश असल्याचे निदर्शनास आले आहे. भाजपाचे परेश रामशेठ ठाकूर यांच्याकडे सर्वाधिक ९५ कोटी ४७ लाख रूपयांची मालमत्ता आहे. निवडणूक लढणाऱ्या तब्बल ९९ टक्के उमेदवारांकडे लाखो रूपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट झाले आहे. नगरपालिकेची निवडणूक लढणाऱ्या अनेकांकडे आमदार व खासदारांपेक्षाही जास्त मालमत्ता आहे.
देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पनवेलची देश-विदेशात ओळख निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो रेल्वे, नैना, जवळच असलेल्या जेएनपीटीमुळे पुढील पाच वर्षामध्ये ६० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक या परिसरामध्ये होणार आहे. यामुळे पनवेल महापालिकेच्या निवडणुकीकडे राजकीय व उद्योग क्षेत्राचेही लक्ष लागले आहे. भविष्यातील श्रीमंत पालिका आपल्या ताब्यात असावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यास सुरवात केली आहे. भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेने उद्धव ठाकरे, शेकाप, राष्ट्रवादी, काँगे्रस आघाडीने शरद पवार यांच्यापासून पक्षाच्या प्रमुख नेत्यांना प्रचारासाठी मैदानात उतरविले आहे. पण याबरोबरच सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना इच्छुकांच्या सामाजिक योगदानाबरोबर आर्थिक स्थितीलाही प्राधान्य दिले आहे. निवडणुकीमध्ये कोण किती पैसे खर्च करू शकतो याची विचारणा अनेकांनी उमेदवारीसाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये इच्छुकांना केली होती. प्रत्यक्ष उमेदवारी वाटपामध्येही श्रीमंतांना मानाचे स्थान दिल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांपैकी तब्बल १६० उमेदवारांकडे १ कोटीपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय तब्बल ९९ टक्के उमेदवारांकडे लाखो रूपयांची संपत्ती आहे. शेतजमिनीपासून व्यावसायिक भूखंड, गाळे असणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते रामशेठ ठाकूर यांचा मुलगा व आमदार प्रशांत ठाकूर यांचा भाऊ परेश ठाकूर यांनी ९५ कोटी ४७ लाख रूपयांची मालमत्ता जाहीर केली असून सर्वात श्रीमंत उमेदवार तेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यानंतर बांधकाम व्यावसायिक असलेले किशोर काशिनाथ म्हात्रे यांनी ३७ कोटी १ लाख रूपयांची, रामदास शेवाळे यांनी २९ कोटी ७९ लाख रूपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. राज्यातील प्रमुख ठेकेदार अशी ओळख असलेले माजी नगराध्यक्ष व शेकापचे नेते जे. एम. म्हात्रे यांचे चिरंजीव प्रीतम म्हात्रे यांच्याकडेही २६ कोटी ७१ लाख रूपयांची मालमत्ता आहे. पनवेलच्या निवडणुकीमध्ये तब्बल श्रीमंत उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. यापैकी काहीजण अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. काही चेहरे फक्त पैशाच्या बळावर निवडणुकीच्या रणांगणात आहेत.

ठाकुरांची श्रीमंती
९५ कोटी ४७ लाख रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता घोषित केलेले परेश ठाकूर हे पनवेलमधील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्या बँक व इतर वित्तीय संस्थांमध्ये ६ कोटी ६० लाख व पत्नीच्या नावावर ४८ लाख रुपयांची गुंतवणूक आहे. विविध कंपन्यांमध्ये बंधपत्रे व रोखे स्वरूपात ३ कोटी २४ लाख, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, पोस्टाच्या बचती व एलआयसीमध्ये ७ कोटी ९४ लाख रुपयांची गुंतवणूक आहे. परेश यांच्याकडे २ लाख ८६ हजार व पत्नीकडे १७ लाख २० हजार रुपयांचे दागिने आहेत. पनवेल तालुक्यातील पाडेघर येथे त्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात शेत जमीन आहे. याच परिसरामध्ये दोन अकृषिक भूखंड आहेत. याशिवाय त्यांच्या मालकीच्या तब्बल ४ व्यापारी इमारती आहेत. त्यांच्या नावावर पाच सदनिका व इतर एकूण ४३ कोटी ४८ लाखांची मालमत्ता आहे. पत्नीच्या नावावर वहाळ येथे शेतजमीन व पुष्पक नोडमध्ये अकृषिक भूखंड अशी १८ कोटी ८६ लाख रुपयांची मालमत्ता आहे.

२०० नाही
९ कोटींची मालमत्ता
निवडणुकीमध्ये खारघरच्या लीना गरड यांच्या मालमत्तेकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांनी २०० कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती. परंतु महापालिका निवडणुकीत दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी तेव्हा ३७ कोटी ६७ लाख रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती. महापालिका निवडणुकीमध्ये त्यांनी ९ कोटी ८१ लाख रुपयांचीच मालमत्ता जाहीर केली.

म्हात्रेंकडे स्थावर मालमत्ता जास्त
जे. एम. म्हात्रे यांचे चिरंजीव प्रीतम म्हात्रे यांच्याकडे २६ कोटी ७१ लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यांची बँक व इतर वित्तीय संस्थांमध्ये २९ लाख रुपये, कंपन्यांमध्ये बंधपत्रांमध्ये २ कोटी २० लाख रुपयांची गुंतवणूक आहे. उरणमधील विंधणे येथे त्यांच्या शेतजमिनीची किंमत १६ कोटी ७८ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

Web Title: 160 crore candidate in Panvel battleground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.