अडकलेले कांद्याचे १६२ कंटेनर परदेशात रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 07:41 AM2020-09-22T07:41:59+5:302020-09-22T07:42:19+5:30
निर्यातदारांनी घेतला सुटकेचा नि:श्वास : निर्यातबंदीनंतर जेएनपीटी बंदरात अडकून पडला होता माल
लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठविण्यात आल्यानंतर मागील सहा दिवसांपासून जेएनपीटी बंदरात अडकून पडलेले निर्यातीसाठी आलेले कांद्याचे १६२ कंटेनर रविवारी बंदरातून रवाना झाले असल्याची माहिती जेएनपीटीकडून देण्यात आली.
केंद्र सरकारने सहा दिवसांपूर्वी तडकाफडकी कांदा निर्यातबंदी लादली होती. या निर्यातबंदीमुळे मात्र, जेएनपीटी बंदरातून युरोप आणि मिडल इस्ट येथे निर्यातीसाठी आलेले कांद्याचे १६२ कंटेनर बंदरात अडकून पडले होते. जेएनपीसीटी बंदरासह अंतर्गत असलेल्या अन्य तीन खासगी बंदरात एकूण ३,८८८ मॅट्रिक टन कांदा अडकून पडल्याने निर्यातदार विवंचनेत सापडले होते. त्यातच अडकून पडलेल्या कांद्याच्या प्रत्येक रिफर कंटेनरसाठी निर्यातदारांना प्रति दिन पंधराशे रुपये अतिरिक्त भाडे मोजावे लागत होते. मोजाव्या लागणाऱ्या या अतिरिक्त ज्यादा खर्चामुळे मात्र, निर्यातदारही पुरते हैराण झाले होते. पण कांदा परदेशात रवाना झाल्याने निर्यातदारांना दिलासा मिळाला आहे.
निर्यातबंदी उठविल्याने मिळाला दिलासा
निर्यातबंदी उठवण्यासाठी देशभरात केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन पेटले होते. केंद्र सरकारच्या विरोधात निषेधही करण्यात आला होता. अखेर आंदोलनाची दखल घेऊन केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बंदरात निर्यातीसाठी बंदरात अडकलेले १६२ कांद्याचे कंटेनर बंदरातून रवाना झाल्याची माहिती जेएनपीटी नियंत्रण कक्षातून देण्यात आली.