कृषी खात्यात १६२ नियमबाह्य बदल्या
By admin | Published: June 25, 2016 03:43 AM2016-06-25T03:43:09+5:302016-06-25T03:43:09+5:30
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे कृषी खात्याचे मंत्रिपद असतानाच्या १९ महिन्यांत झालेल्या १६२ अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्यांची जंत्रीच समोर आली आहे
यदु जोशी, मुंबई
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे कृषी खात्याचे मंत्रिपद असतानाच्या १९ महिन्यांत झालेल्या १६२ अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्यांची जंत्रीच समोर आली आहे. या बदल्यांमध्ये ‘अर्थपूर्ण’ व्यवहार झाल्याची ५०० पानी तक्रार थेट राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे करण्यात आली आहे.
सार्वत्रिक बदल्यांचा कालावधी नसताना देखील लोकप्रतिनिधींच्या शिफारशींचा आधार घेत या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत राज्यपालांकडे केलेल्या तक्रारीमध्ये खडसे व मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखविण्यात आले आहे. अॅड. प्रशांत कायंदे यांनी माहिती अधिकारात ही माहिती मिळवली आहे.
नागरी सेवा मंडळास प्रस्तावित करण्यात आलेल्या बदल्या आणि या मंडळाने मान्य केलेल्या बदल्यांच्या संख्येतही मोठी तफावत आढळते. खडसे यांच्या स्तरावर काही बदल्या घुसवण्यात आल्या. अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या २६ बदल्या मंडळास प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. मंडळाने त्यातील १३ मान्य केल्या असताना आणखी १३ बदल्या या मंत्री स्तरावर समाविष्ट करण्यात आल्या. कृषी उपसंचालकांच्या २७ बदल्या प्रस्तावित होत्या. त्यापैकी नागरी सेवा मंडळाने एक मान्य केली असताना १० जणांच्या बदल्या करण्यात आल्या. महाराष्ट्र कृषी सेवा अधिकारी वर्ग ब च्या ६६ बदल्या मंडळास प्रस्तावित केल्या होत्या. मंडळाने १७ मान्य केल्या, मंत्री स्तरावर १५ अधिकाऱ्यांचा समावेश झाला. मात्र उर्वरित ४० अधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला नागरी सेवा मंडळाची मान्यताच घेतली नाही. राज्यपाल काय निर्णय घेतात, याकडे कृषी खात्याचे लक्ष लागून आहे.
सार्वत्रिक बदल्या करताना नियमानुसार चारच अधीक्षक कृषी अधिकारी बदलीपात्र होते. त्यापैकी तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र त्याचवेळी अपात्र २५ अधिकाऱ्यांच्याही बदल्या उरकण्यात आल्या. २९ कृषी उपसंचालक पात्र होते. त्यातील २३ जणांच्या बदल्या करण्यात आल्या, तर पात्र नसलेल्या १४ जणांच्या बदल्या करण्यात आल्या. ७५ महाराष्ट्र कृषी सेवा अधिकारी (ब) नियमानुसार बदलीस पात्र होते. त्यातील ६० जणांच्या बदल्या करण्यात आल्या. अपात्र तब्बल ७७ जणांच्या बदल्या करण्यात आल्या. १९१ कृषी अधिकारी बदलीस पात्र होते. त्यातील १६२ जणांच्या बदल्या झाल्या. बदलीस पात्र नसलेल्या ४६ जणांच्या बदल्या करण्यात आल्या.
नियमबाह्यरीत्या केलेल्या
बदल्यांचा तपशील
संवर्गनियमबाह्य
बदल्या
अधीक्षक कृषी अधिकारी८
कृषी उपसंचालक८
म.कृ.से. ब वर्ग अधिकारी९
कृषी अधिकारी१