१६५ वैद्यकीय अधिकार्यांचे राजीनामे
By Admin | Published: July 1, 2014 11:01 PM2014-07-01T23:01:22+5:302014-07-02T00:43:30+5:30
मॅग्मो संघटनेचे बेमुदत असहकार आंदोलन
बुलडाणा : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही वैद्यकीय अधिकार्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे ४ जून रोजी स्थगित झालेले आंदोलन मॅग्नो संघटनेने आज १ जुलै पासून पुन्हा सुरू केले असून बेमुदत असहकार आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात सहभागी झालेले १६५ राजपत्रित वैद्यकीय अधिकार्यांनी सामूहिक राजीनामे दिल्यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा कोलमडलीे आहे. राज्यातील जवळपास ८0 टक्के जनतेला आरोग्य सुविधा पुरविणार्या ग्रामीण ग्रामीण भागात सेवा देणार्या वैद्यकीय अधिकार्यांकडे शासनाने सातत्याने दूर्लक्ष होत असून अनेक प्रश्न प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. याबाबत अनेकदा चर्चा करूनही शासनाकडून मॅग्मो संघटनेस आश्वासनाशिवाय काहीच प्राप्त झालेले नाही. त्यामुळे २ जून पासून स्थगित केलेले असहकार आज १ जुलै पासून पुन्हा सुरू केले आहे. यापूर्वी आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी १0 दिवसांचे आत मागण्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबधीत अधिकार्यांना दिले होते. परंतु अद्यापही प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्या नाहीत. तसेच मागण्यांसदर्भात कोणताही प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजुरीकरीता ठेवण्यात आला नाही. त्यामुळे राज्यातील वैद्यकीय अधिकार्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे संघटनेने पुन्ह असहकार, कामबंद आंदोलन छेडले आहे. मागण्यांच्या पूर्ततेसाठी मॅग्नो राज्य अध्यक्ष, सरचिटनीस यांनी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंंत प्रमुख मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावनी होत नाही, तो पर्यंंत जिल्हा रूग्णलय येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंंत धरणे, निदर्शने कार्यक्रम होईल, अशी माहिती मॅग्नो संघटनेचे अध्यक्ष डॉ.निलेश टापरे ,सचिव डॉ. राजेंद्र सांगळे ,अस्थाई सेल अध्यक्ष डॉ. पंकज मगर, मॅग्मो सायबर सेल प्रमुख डॉ. अनिरूध्द गोंधकर, डॉ. सागर पाटील, कोअर कमिटी सदस्य डॉ. प्रविण निकस, डॉ. शैलेश खंडारे, डॉ. अमीत बामरटकर, डॉ.निलेश दहातोंडे, महिला सचिव डॉ. उज्वला पाटील, डॉ. ज्ञानेश्वरी मोहोकार यांनी दिली आहे. ** आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम खामगाव : या बंदचा रुग्णसेवेवर आज पहिल्याच दिवशी परिणाम दिसून आला. येथील सामान्य रुग्णालयात वर्ग २ चे १३ वैद्यकीय अधिकारी असून सर्वच कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. डॉक्टरांच्या या आंदोलनाचा प्रभाव आज येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सुध्दा दिसून आला. आंतररुग्ण विभागातील रुग्ण तपासणी केल्यानंतर वर्ग १ च्या वैद्यकीय अधिकारी यांनीच बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण तपासणी करावी लागली. त्यामुळे येथील बाह्यरुग्ण विभाग आज दोन तास उशीरा सुरु झाला. त्यामुळे अनेक रुग्ण डॉक्टरांची प्रतीक्षा केल्यानंतर कंटाळून निघून गेले. जिल्ह्यातील मॅग्मो संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ.निलेश टापरे, डॉ.शैलेश खंडारे यांच्यासह १६५ डॉक्टरांनी आपले राजीनामे सुध्दा दिले आहेत.