कार्तिकी यात्रेसाठी एसटीच्या १६६ जादा गाड्या
By Admin | Published: November 2, 2016 08:34 PM2016-11-02T20:34:27+5:302016-11-02T20:34:27+5:30
आषाढीनंतरची दुसरी मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणा-या पंढरीच्या कार्तिकी यात्रेसाठी सोलापूर विभागाने एसटीच्या १६६ जादा गाड्यांची सोय केली असून, ७ ते १४ नोव्हेंबरपर्यंत
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 02 - आषाढीनंतरची दुसरी मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणा-या पंढरीच्या कार्तिकी यात्रेसाठी सोलापूर विभागाने एसटीच्या १६६ जादा गाड्यांची सोय केली असून, ७ ते १४ नोव्हेंबरपर्यंत या गाड्या धावणार असल्याचे यात्रा प्रमुख तथा विभागीय वाहतूक अधीक्षक मुकुंद दळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पंढरपुरातील चंद्रभागा बस स्थानकावर निवारा शेडही उभारण्यात आला आहे.
शुक्रवार दि. ११ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा आहे. संपूर्ण राज्यभरातून आणि कर्नाटक, आंध्र प्रदेशातील भाविक या सोहळ्यास आवर्जुन हजेरी लावत असतात. कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा, बीदर या जिल्ह्यातील भाविकांची संख्या पाहता राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने जादा एस. टी. गाड्यांची आखणी केली आहे. सोलापूर बस स्थानकातून २०, बार्शी आगारातून ३६, करमाळ्यातून १७, सांगोल्यातून २०, मंगळवेढ्यातून १२, पंढरपूर बसस्थानकातून २१, अक्कलकोट डेपोतून १३, अकलूज आगारातून १५ तर कुर्डूवाडी बस स्थानकातून १२ अशा १६६ एस. टी. गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ७ कंट्रोल पार्इंटवरुनही जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. मोहोळ येथून ३, शेटफळ-मोडनिंबमधून२, टेंभुर्णीतून २, नातेपुतेतून २, साळमुख येथून १ तर महूद येथून १ अशा ११ बसगाड्या धावणार असल्याचे दळवी यांनी सांगितले. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खान्देश आदी भागातून येणा-या भक्तगणांना सुमारे २०० हून अधिक गाड्या धावणार आहेत.
५० कर्मचा-यांची नियुक्ती; चालक, वाहकांची सोय
७ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत कार्तिक यात्रेसाठी पंढरीत भाविकांची मोठी गर्दी असते. भाविकांबरोबर वाहक आणि चालकांना कुठल्या समस्या उद्भवू नयेत यासाठी सोलापूर आगाराने ५० कर्मचा-यांची तुकडी तैनात केली आहे. चालक आणि वाहकांच्या राहण्याची सोय पंढरपूर मार्केट कमिटीच्या रेस्ट हाऊस आणि अन्य ठिकाणी करण्यात आली आहे.