... नाहीतर शिवाजी महाराजांनाही संघाचे म्हटले असते - धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 07:47 PM2018-04-03T19:47:58+5:302018-04-03T20:03:49+5:30
नशीब हा संघ 16 व्या शतकात नव्हता, नाहीतर यांनी छत्रपती शिवाजी महाराजही संघाचे होते, असे म्हणायला कमी केले नसते, अशी जोरदार टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नेसरी येथील जाहीर सभेत संघावर केली.
नेसरी (कोल्हापूर ) : शहीद राजगुरु हे संघाचे होते अशी चर्चा सध्या भाजपावाले करु लागले आहेत. स्वातंत्र्यलढयात संघ नव्हता. मात्र, ज्यांनी स्वातंत्र्यलढयात आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना संघाचे असल्याचे सांगण्याचे धाडस हे भाजपावाले करत आहेत. नशीब हा संघ 16 व्या शतकात नव्हता, नाहीतर यांनी छत्रपती शिवाजी महाराजही संघाचे होते, असे म्हणायला कमी केले नसते, अशी जोरदार टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नेसरी येथील जाहीर सभेत संघावर केली.
किती महापुरुषांचा अपमान कराल, किती दिवस सहन करायचा महापुरुषांचा अपमान. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हल्लाबोल आंदोलन सुरु केले आहे. सत्तेत असलेल्या भाजपावाल्यांची ट्रिपल तलाक, सबसिडी यावर चर्चा करतात. मात्र, या देशातील सर्वसामान्य जनतेला दिलेल्या विषयांवर कधी चर्चा करणार असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला. इतिहास घडवलेल्या मातीत मी पहिल्यांदा आलो आहे. या मातीत लढाईचे स्फुरण आहे. 16 व्या शतकात नेसरीने जो इतिहास घडवला तोच परिवर्तनाचा इतिहास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या हल्लाबोलच्या माध्यमातून घडवल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.
या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार हसन मुश्रीफ, माजी खासदार निवेदिता माने, आमदार श्रीमती संध्या कुपेकर, आमदार प्रकाश गजभिये, आमदार जयदेव गायकवाड, जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, मंदा बाभुळकर आदींसह चंदगड, आजरा, गडहिंग्लज यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.