दिवाळीआधीच १७ शहरे प्रदूषित; श्वसनविकार, हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचे आरोग्य विभागाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 11:13 AM2023-11-07T11:13:47+5:302023-11-07T11:13:58+5:30
प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांमध्ये श्वसनविकारांत वाढ होत आहे. त्यातच हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २००च्याही पुढे गेला आहे.
मुंबई : देशाची राजधानी नवी दिल्ली प्रदूषणाने गुदमरली असताना राज्यातील हवेची गुणवत्ताही खालावत चालली आहे. त्याची गंभीर दखल घेत सार्वजनिक आरोग्य विभागाने दिवाळीपूर्वीच राज्यभरातील १७ प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली आहे. तसेच यासंदर्भात महापालिका आणि जिल्हा परिषदांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यात मुंबईसह बदलापूर, उल्हासनगर आणि वाशी या शहरांचा समावेश आहे. त्यानुसार रुग्णालयांत येणाऱ्या श्वसनविकाराच्या रुग्णांवर लक्ष ठेवण्याचे आदेश रुग्णालयांना देण्यात आले आहेत.
प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांमध्ये श्वसनविकारांत वाढ होत आहे. त्यातच हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २००च्याही पुढे गेला आहे. त्यामुळे या अशा वातावरणात दीर्घकाळ राहिल्यास निरोगी लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे सरकारने जाहीर केली आहेत. वायु प्रदूषणाशी संबंधित आजार आणि त्यासंदर्भातील मृत्यू्ंची आकडेवारी नोंदवण्याबरोबरच आरोग्य सुविधांद्वारे आणि शहरांद्वारे आकडेवारी संकलित करून राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या (एनसीडीसी) इमेलवर पाठवावीत, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
मार्गदर्शक तत्त्वे काय?
शहरातील नोंदविलेल्या दैनंदिन हवा गुणवत्ता निर्देशांक पातळी व श्वसनविकाराचे रुग्ण याची माहिती संकलित करावी
हवा गुणवत्ता निर्देशांक पातळी आणि असुरक्षित लोकसंख्येच्या घनतेनुसार हॉट स्पॉट ओळखून त्यांना आवश्यक आरोग्य सेवा पुरवाव्यात.
मास्क वापरणे ऐच्छिक
प्रदूषणापासून काही वेळेपासून ज्यांना मास्क वापरण्याची इच्छा आहे, त्यांनी एन-९५ आणि एन-९९ वापरताना व्यवस्थित काळजी घ्यावी. नाक आणि तोंड झाकले जाईल याची काळजी घ्या. मास्क वापर झाल्यानंतर ते बदलत राहणे गरजेचे आहे. प्रदूषणापासून वाचण्यासाठी पेपर मास्क, रुमाल आणि कपडा फार फायदेशीर नाही.
शहर आणि जिल्ह्यांसाठी
आरोग्य कृती आरखडा
वायू प्रदूषणाची आकडेवारी आणि रुग्णांची आकडेवारी यामधील परस्पर संबंध तपासणे.
महिनानिहाय वायू प्रदूषणाच्या आकडेवारीचे दस्तवेजीकरण. असुरक्षित लोकसंख्येच्या आकडेवारीचे दस्तवेजीकरण.
डासांना पळविणाऱ्या अगरबत्तीपासून सावधान
शहरे आणि रुग्णालये...
जे जे रुग्णालय - मुंबई
नवीन मुंबई जनरल हॉस्पिटल - वाशी
आर एच बदलापूर - बदलापूर
सेंट्रल हॉस्पिटल - उल्हासनगर
डॉ. व्ही. एस. वैद्यकीय महाविद्यालय - सोलापूर
जिल्हा रुग्णालय - नाशिक
जिल्हा रुग्णालय - अमरावती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - सांगली
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - जळगाव
जिल्हा रुग्णालय - जालना
सी पी आर एच - कोल्हापूर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - लातूर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - अकोला
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - छ. संभाजीनगर
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय - पुणे
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - नागपूर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - चंद्रपूर