शासन सोडविणार १७ कोटींचे सोने

By admin | Published: December 30, 2015 01:57 AM2015-12-30T01:57:37+5:302015-12-30T01:57:37+5:30

शेतकऱ्यांनी परवानाप्राप्त सराफा व्यापाऱ्याकडे गहाण ठेवलेले १७ कोटी २९ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने खुद्द शासन सोडविणार आहे. शासनाच्या सावकारी कर्जमुक्ती योजनेचा पश्चिम

17 crores gold will be solved by the government | शासन सोडविणार १७ कोटींचे सोने

शासन सोडविणार १७ कोटींचे सोने

Next

- राजेश निस्ताने,  यवतमाळ
शेतकऱ्यांनी परवानाप्राप्त सराफा व्यापाऱ्याकडे गहाण ठेवलेले १७ कोटी २९ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने खुद्द शासन सोडविणार आहे. शासनाच्या सावकारी कर्जमुक्ती योजनेचा पश्चिम विदर्भातील ८ हजार ५०० शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे.
सतत दुष्काळाचा सामना करणारे शेतकरी थकबाकीदार झाल्याने बँका त्यांना कर्ज देत नाही. अशा वेळी शेतकऱ्याला आपल्या घरातील दागदागिने गहाण ठेवून पेरणीची वेळ निभावून न्यावी लागते. मात्र, नापिकीमुळे हे गहाण ठेवलेले दागिने सोडविणे शेतकऱ्याला शक्य होत नाही. अनेकदा हे दागिने सावकाराकडेच बुडतात. यंदा भाजप-सेना युती शासनाने राज्यातील शेतकऱ्यांच्या सावकारी कर्जमुक्तीची घोषणा केली. शेतकऱ्याच्या घरातील कुणीही सरकारी नोकरीत असू नये, एका कुटुंबातील केवळ एकच गहाण मुक्त केले जाईल, असा निकष त्यासाठी ठेवला गेला.
गेल्या वर्षभरात पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात १ लाख १३ हजार ३२८ शेतकऱ्यांनी परवानाप्राप्त सावकाराकडे दागिने गहाण ठेवले. ही प्रकरणे तपासणीसाठी आॅडिटर व तलाठ्यांकडे देण्यात आली. आतापर्यंत त्यातील ८ हजार ५३८ प्रकरणे निकषानुसार पात्र ठरली.
त्यात २७९ परवानाप्राप्त सावकार
तथा सराफा व्यापाऱ्यांकडे गहाण ठेवलेले १७ कोटी २९ लाख ९६ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, शासनाकडून कर्जमुक्त केले जाणार आहे.
ही रक्कम शासन स्वत: सावकारांच्या बँक खात्यात थेट जमा करणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ही मुदत असल्याने, गहाणांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी कळंब येथे सहायक निबंधक कार्यालयात सावकार व संबंधित शेतकऱ्यांना बोलावून दागिने परत करण्याची कार्यवाही केली गेली. सावकारी कर्जमाफीचा सर्वाधिक लाभ अमरावती व बुलडाणा जिल्ह्यात घेतला गेला. सर्वात कमी प्रकरणे अकोला जिल्ह्यात दाखल झाली.

आॅडिटर व्याज, तर तलाठी शेती आहे की नाही, याची तपासणी करीत आहे. अद्याप ५० टक्के प्रकरणे तपासायची असल्याने, सावकारी कर्जमुक्तीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या तो १७ कोटी २९ लाख एवढा आहे.- श्रीमती एस.आर. डोंगरे, विभागीय सहनिबंधक, अमरावती

Web Title: 17 crores gold will be solved by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.