उड्डाणपूल उभारणीसाठी १७ कोटी खर्च
By admin | Published: January 19, 2017 06:03 AM2017-01-19T06:03:13+5:302017-01-19T06:03:13+5:30
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि रेल्वेचे वेळापत्रक स्थिर राहावे यासाठी स्थानक हद्दीत असणारे रेल्वे फाटक बंद केले जात आहे.
मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि रेल्वेचे वेळापत्रक स्थिर राहावे यासाठी स्थानक हद्दीत असणारे रेल्वे फाटक बंद केले जात आहे. त्याऐवजी रेल्वे व स्थानिक पालिकांच्या सहकार्याने रोड उड्डाणपूल (आरओबी) उभारले जात आहे. मात्र, शासकीय उदासीनतेमुळे हे पूल अजूनही अर्धवट अवस्थेत असून आतापर्यंत १७ कोटी रुपये पुलांच्या कामावर खर्च करण्यात आले आहेत.
मध्य रेल्वे मार्गावर कळवा-खारेगाव, आंबिवली, ठाकुर्ली, चुनाभट्टी येथे रेल्वे फाटक आहेत. स्थानिक वाहतुकीसाठी फाटक दोन ते तीन मिनिटे सुरू राहिल्यास लोकल फेऱ्यांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे फेऱ्यांना लेटमार्क लागण्यासह वेळापत्रक बिघडते. काही वेळेला तर लोकल फेऱ्या रद्दही कराव्या लागतात. महत्त्वाची बाब म्हणजे फाटकांच्या ठिकाणी अनेकदा अपघातांनाही तोंड द्यावे लागते. त्यामुळे फाटक बंद करून उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. यात स्थानिक पालिकांचीही मदत घेतली जात असून सुरुवातीला खारेगाव आणि शहाड-आंबिवली येथेही उड्डाणपूल उभारले जात आहे. प्रस्तावानुसार रेल्वेच्या हद्दीतील उड्डाणपुलांचे बांधकाम रेल्वे, तर पालिकेच्या हद्दीतील बांधकामाची जबाबदारी ही पालिकेकडे आहे. शहाड-आंबिवली दरम्यान उड्डाणपुलाचे काम २0१५पासून सुरू करण्यात आले. त्यासाठी आतापर्यंत रेल्वेचे नऊ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून अजूनही पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. दोन आठवड्यांपूर्वी खारेगावजवळीलही फाटक बंद करून उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू केले असून, या कामासाठीही साडेआठ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांकडून देण्यात आली. खारेगाव येथे उड्डाणपूल उभारण्याचा एकूण खर्च १७ कोटी रुपये एवढा आहे. या कामात आतापर्यंत रेल्वेकडून गर्डर उभारण्यात आला असून उर्वरित काम हे ठाणे पालिकेकडून केले जाईल; परंतु अजूनही काम पुढे सरकलेले नाही. (प्रतिनिधी)
महापालिकेकडून पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी कोणतीही तयारी केलेली नाही. त्यामुळे हे काम कधीपर्यंत पूर्ण होईल हे सांगणे कठीण आहे.
- रवींद्र गोयल (मध्य रेल्वे-विभागीय रेल्वे व्यवस्थापक)