राज्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत १७ टक्के अधिक मान्सून वर्षा; मराठवाड्यात सर्वाधिक ३२ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 11:23 AM2020-09-28T11:23:59+5:302020-09-28T11:25:18+5:30
गेल्या दोन वर्षांपासून पावसाने संपूर्ण देशासह राज्यावर कृपादृष्टी ठेवली आहे.
पुणे : यंदा मॉन्सूनने भरभरुन साथ दिली असून पावसाळ्याचे चार महिने संपत असताना राज्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत १७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असतानाच विदर्भात मात्र -९ टक्के पाऊस कमी असून यवतमाळ -२३ टक्के आणि अकोला जिल्ह्यात - २६ टक्के कमी पाऊस झाला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून पावसाने संपूर्ण देशासह राज्यावर कृपादृष्टी ठेवली आहे. दरवर्षी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यात यंदा सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक ३२ टक्के पाऊस पडला आहे. पावसाळ्याचे ४ महिने संपत आले असताना २७ सप्टेंबरपर्यंत विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी केवळ वाशिम, नागपूर आणि बुलढाणा या ३ जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. अन्य ८ जिल्ह्यात अजूनही कमी पाऊसमान आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या तीनही विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे.
मॉन्सून साधारण १५ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापतो़ यंदा राज्यात मॉन्सूनचे उशिरा आगमन झाले तरी त्याने संपूर्ण राज्य व्यापण्याची आपली परंपरा यंदा पाळली. मात्र, विदर्भातील सर्वच जिल्ह्यात सुरुवातीपासूनच यंदा पाऊसमान कमी होते. त्यात बंगालच्या उपसागरात यंदा कमी दाबाचे क्षेत्र कमी तयार झाली व त्यांचा मुख्य अक्ष हा हिमालयाच्या पायथ्याशी असल्याने बंगालच्या उपसागराकडून मिळणारा पाऊस यंदा विदर्भात फारसा बरसलाच नाही.
जूनच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळानंतरही अरबी समुद्रात सातत्याने द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात नियमितपणे पाऊस होत गेला.
.....................
राज्यात सर्वाधिक पाऊस झालेले जिल्हे : अहमदनगर (८४टक्के), मुंबई शहर (६०), मुंबई उपनगर (६९), औरंगाबाद (६८ टक्के)
सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेले जिल्हे रत्नागिरी (२५ टक्के), सिंधुदुर्ग (५४टक्के), धुळे (५०), जळगाव (२५), कोल्हापूर (२४), नाशिक (२१), पुणे (४२), सांगली (३१), सोलापूर (३०), बीड (४९), जालना (४१), लातूर (३१), उस्मानाबाद (२६), परभणी (२० टक्के) सरासरीपेक्षा अधिक सर्वसाधारण पाऊस झालेले जिल्हे पालघर (१४ टक्के), रायगड (१६), नंदूरबार (११), सातारा (८), हिंगोली (८), नांदेड (१०), बुलढाणा (६), वाशिम (१७ टक्के), नागपूर (७ टक्के)़
सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेले जिल्हे : अकोलो (-२६ टक्के), अमरावती (-१९), भंडारा (-४), चंद्रपूर (-१८), गडचिरोली (-८), गोंदिया (-८), वर्धा (-७), यवतमाळ (-२३टक्के)
़़़़़़़़़़़़़़़़
कोकण विभागात २९ टक्के अधिक
मध्य महाराष्ट्रात ३१ टक्के अधिक
मराठवाडा ३२ टक्के अधिक
विदर्भात -९ टक्के कमी पाऊसमान
संपूर्ण राज्यात १७ टक्के अधिक पाऊस