दिवसभरात १७ प्रवाशांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2016 02:44 AM2016-09-22T02:44:12+5:302016-09-22T02:44:12+5:30

उपनगरीय रेल्वे हद्दीत मंगळवारी घडलेल्या अपघातांच्या घटनांमध्ये १७ प्रवाशांचे बळी गेले.

17 passengers die in the day | दिवसभरात १७ प्रवाशांचा मृत्यू

दिवसभरात १७ प्रवाशांचा मृत्यू

Next


मुंबई : उपनगरीय रेल्वे हद्दीत मंगळवारी घडलेल्या अपघातांच्या घटनांमध्ये १७ प्रवाशांचे बळी गेले. यात रूळ ओलांडतानाच १0 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद लोहमार्ग पोलिसांकडे झाली आहे. तर तीन प्रवाशांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. कुर्ला, कल्याण, मुंबई सेंट्रल पोलीस ठाण्यात जास्त अपघातांची नोंद असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
रेल्वे अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. यात दोन रुळांच्या मध्ये तारांचे कुंपण, रुळांजवळ असणाऱ्या झोपड्यांजवळ भिंतींचे कुंपण बांधण्यात येत आहे. महामंडळाने तर १२ स्थानकांच्या परिसरांत प्रवासी सुरक्षेसाठी १२0 कोटींची तरतूद केली आहे.
मात्र या योजना करूनही रूळ ओलांडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. मंगळवारी तीन अपघात ट्रेनमधून पडून झाले. एकाचा डहाणू प्लॅटफॉर्मवर लोकलची ठोकर लागून मृत्यू झाला. तर अन्य तीन जणांचे मृत्यू हे नैसर्गिक झाल्याची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
>सर्व स्थानकांजवळ बॅरिकेड्स टाका
जास्तीत जास्त अपघात रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना होत असल्याने अपघात रोखण्यासाठी सर्व उपनगरीय रेल्वे स्थानकांजवळ बॅरिकेड्स टाका, अशी सूचना उच्च न्यायालयाने रेल्वेला केली. ‘मुंबई उपनगरीय रेल्वे ट्रॅकना बॅरिकेड्स टाका. कारण जास्तीत जास्त मृत्यू रेल्वे ट्रॅक क्रॉस
करताना होतात,’ असे न्या. व्ही. एम. कानडे व न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने म्हटले.
हँकॉक पूल जुना झाल्याने रेल्वे प्रशासन व महापालिकेने हा पूल पाडला. मात्र पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेणॉय यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत खंडपीठाने वरील सूचना रेल्वेला केली.
हँकॉक पूल पाडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे रेल्वेनेही उच्च न्यायालयात मान्य केले. त्यामुळे या ठिकाणी बॅरिकेड्स टाकण्यात येतील, असे रेल्वेचे वकील सुरेश कुमार यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. रेल्वे पोलिसांकडे असलेल्या नोंदीनुसार, गेल्या महिन्यात १५० लोकांचा मृत्यू ट्रॅक ओलांडताना झाला. तर २० सप्टेंबर रोजी १७ लोकांचा मृत्यू झाला. त्यातील आठ पश्चिम रेल्वे व नऊ जणांचा मृत्यू मध्य रेल्वेच्या हद्दीत झाला.
>रेल्वे बोर्डातील अधिकाऱ्यांकडून आढावा
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊल उचलण्याची सूचना रेल्वे बोर्डाकडून पश्चिम व मध्य रेल्वे प्रशासनाला केली आहे.
बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने बुधवारी मुंबईत रेल्वे स्थानकांना भेट देत प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भातील माहिती घेतली. त्या वेळी रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर न्यायालयीन प्रक्रियेऐवजी जागीच रेल्वे नियमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यावर भर देण्याचे सुचविले. त्यादृष्टीने पाऊल उचलण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून या वेळी सांगण्यात आले.
मुंबई भेटीवर आलेल्या समितीत रेल्वे बोर्डाचे सल्लागार ए.एस. उपाध्याय, जेपीएस सिंह आणि अन्य अधिकाऱ्यांचा समावेश होता. या समितीकडून अंधेरी-जोगेश्वरी दरम्यानच्या फाटकाचीही पाहणी करण्यात आली.

Web Title: 17 passengers die in the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.