राज्यातील १७ जागांसह देशभरातील ७१ मतदारसंघांमध्ये आज होणार मतदान!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 03:27 AM2019-04-29T03:27:30+5:302019-04-29T06:57:07+5:30
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील १७ मतदारसंघांसह देशातील ७१ जागी सोमवारी (२९ एप्रिल) मतदान होईल. या टप्प्यात राज्यातील ३२३ उमेदवारांचे भवितव्य यंत्रांमध्ये बंद होईल
मुंबई/दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील १७ मतदारसंघांसह देशातील ७१ जागी सोमवारी (२९ एप्रिल) मतदान होईल. या टप्प्यात राज्यातील ३२३ उमेदवारांचे भवितव्य यंत्रांमध्ये बंद होईल. राज्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे (धुळे), मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा (दक्षिण मुंबई), भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पूनम महाजन (मुंबई उत्तर-मध्य) यांचा समावेश आहे. या टप्प्यासह राज्यातील निवडणुकीची सांगता होईल.
राजस्थान व उत्तर प्रदेशातील प्रत्येकी १३, प. बंगालमधील आठ, मध्य प्रदेश व ओडिशातील प्रत्येकी सहा, बिहारच्या पाच व झारखंडमधील तीन मतदारसंघांप्रमाणेच जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग मतदारसंघाच्या काही भागातही याच वेळी मतदान होईल. गेल्या वेळी भाजपला भरघोस यश दिलेल्या मध्य प्रदेश व राजस्थानमधील निवडणुकीस सोमवारी सुरुवात होईल. गेल्या निवडणुकीत या दोन्ही राज्यांत एकूण ५४ पैकी ५२ जागा भाजपने जिंकल्या होत्या. मात्र अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव होऊन तेथे काँग्रेसची सरकारे आली. याचे प्रतिबिंब या मतदानात किती पडते हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजपसाठी महत्त्वाचा टप्पा
चौथा टप्पा सत्ताधारी भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचा व कदाचित निर्णायक ठरू शकेल. २०१४ मध्ये या ७१ पैकी ५६ मतदारसंघांत एनडीएने विजय मिळविला होता. इतर जागा तृणमूल काँग्रेस (६) व बिजू जनता दल (६) काँग्रेस (२) आणि पीडीपी (१) यांच्या वाट्याला आल्या होत्या. भाजप असलेल्या जागा टिकवू शकेल का याचा फैसला या टप्प्यात होईल.
९ राज्ये ७१ जागा
बिहार (५), झारखंड (३), मध्य प्रदेश (६), महाराष्ट्र (१७), ओडिशा (६), राजस्थान (१३), उत्तर प्रदेश (१३), पश्चिम बंगाल (८).
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग मतदारसंघात तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. त्याचा दुसरा टप्पा असेल. चार केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग, एस.एस. अहलुवालिया, सुभाष भामरे व बाबुल सुप्रियो या केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य सोमवारी यंत्रबंद होईल. दोन माजी मंत्री सलमान खुर्शीद व अधीर रंजन चौधरी हे काँग्रेसचे दोन माजी केंंद्रीय मंत्रीही रिंगणात आहेत.
लक्षणीय लढती कन्हैया कुमार (भाकप), बैजयंत पांडा (भाजप), डिंपल यादव (सप), शताब्दी रॉय (तृणमूल) हे या टप्प्यातील अन्य काही लक्षणीय उमेदवार आहेत.
राज्यातील १५ विद्यमान खासदारांची परीक्षा
राज्यातील शेवटच्या चौथ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानात राज्यातील तब्बल १५ खासदार पंचवार्षिक परीक्षेला समोरे जात आहेत. त्यात डॉ. सुभाष भामरे, पूनम महाजन, गजानन कीर्तिकर, गोपाळ शेट्टी, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, कपिल पाटील, श्रीकांत शिंदे, राजेंद्र गावित, सदाशिव लोखंडे, राजन विचारे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव, हिना गावित व हेमंत गोडसे यांचा समावेश आहे.
सध्या कुठे आहे कुणाचा खासदार
भाजप : नंदुरबार, धुळे, दिंडोरी, पालघर, भिवंडी, उत्तर मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई
शिवसेना : नाशिक, कल्याण, ठाणे, वायव्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, मावळ, शिरूर, शिर्डी, मुंबई, ठाणे, पालघरच्या उमेदवारांचे भवितव्य होणार यंत्रबंद